अमरावती : महायुतीत शिवसेना शिंदे गट आणि राष्‍ट्रवादी अजित पवार गटाच्‍या आमदारांना पुन्‍हा उमेदवारी मिळाल्‍यास जिल्‍ह्यात भाजपची किमान पाच मतदारसंघांमध्‍ये पंचाईत होणार आहे. मित्रपक्षांना जागा देताना भाजपमधील इच्‍छूकांची समजूत काढण्‍यासाठी भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. राज्‍यात २०१९ मध्‍ये भाजप-शिवसेना युती विरूद्ध काँग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडी अशी लढत झाली.

युतीत अमरावती जिल्‍ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार भाजपच्‍या तर तीन शिवसेनेच्‍या वाट्याला आले होते. या निवडणुकीत युतीला जबर हादरा बसला आणि भाजपचा केवळ एक उमेदवार निवडून येऊ शकला. गेल्‍या पाच वर्षांत मोठे फेरबदल झाले आहेत. राज्‍यात सत्‍तांतरानंतर आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्‍यानंतर समीकरणे बदलून गेली आहेत.

हेही वाचा >>> निवडणुकांच्या तोंडावर ‘लाडक्या बहिणींना’ सरकारची भावनिक साद

गेल्‍या निवडणुकीत काँग्रेस, राष्‍ट्रवादीच्‍या पाठिंब्‍यावर निवडून आलेले युवा स्‍वाभिमान पक्षाचे संस्‍थापक रवी राणा यांनी लगेच भाजपला पाठिंबा जाहीर केला. उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या ते निकटचे मानले जातात. गेल्‍या निवडणुकीत बडनेराची जागा शिवसेनेला गेल्‍याने माघार घेणारे भाजपचे माजी नगरसेवक व प्रदेश कार्यकारिणी सदस्‍य आणि भाजपचे इच्‍छूक उमेदवार तुषार भारतीय यावेळी संघर्षाच्‍या पवित्र्यात आहेत. त्‍यांनी रवी राणा यांच्‍या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. याशिवाय प्रदेश प्रवक्‍ते शिवराय कुळकर्णी, प्रदेश सचिव जयंत डेहनकर यांच्‍यासह अनेक नेते उमेदवारीसाठी इच्‍छुक आहेत.

हेही वाचा >>> लोकसभेतील पराभवानंतर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार विधानसभेच्या तयारीला

अमरावती मतदारसंघात गेल्‍यावेळी भाजप विरूद्ध काँग्रेस अशी लढत झाली. पण, आता परिस्थिती बदलली आहे. काँग्रेसच्‍या आमदार सुलभा खोडके यांना पक्षातून निलंबित करण्‍यात आले आहे. त्‍या राष्‍ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश घेण्‍याचे संकेत आहेत. अमरावतीची जागा महायुतीत अजित पवार गटाला गेल्‍यास भाजपची मोठी अडचण होणार आहे. अमरावतीतून भाजपचे नेते व माजी पालकमंत्री जगदीश गुप्‍ता, किरण पातूरकर यांच्‍यासह काही नेत्‍यांनी तयारी केली आहे.

मोर्शी मतदारसंघातून गेल्‍या निवडणुकीत काँग्रेस, राष्‍ट्रवादीच्‍या पाठिंब्‍यावर निवडून आलेले स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी झाल्‍यानंतर त्‍यांची राष्‍ट्रवादी अजित पवार गटासोबत जवळीक वाढली. ही जागा या गटाला गेल्‍यास भाजपला दावा सोडून द्यावा लागेल. दुसरीकडे, मेळघाटचे प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार राजकुमार पटेल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्‍याची घोषणा केली आहे. याशिवाय दर्यापूरमधून शिंदे गटाचे माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी तयारी केली आहे. या दोन्‍ही ठिकाणी उमेदवारीचा पेच महायुतीत आहे.