मुंबई : पाच वर्षांपूर्वी भायखळ्यात ‘एआयएमआयएम’च्या वारिस पठाण यांचा पराभव करून विधानसभेत धडक देणाऱ्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय महागात पडण्याची चिन्हे आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या जाधव यांना भायखळ्यातूनच पिछाडी मिळाली. त्यामुळे आता यामिनी जाधव यांना शिंदे गट पुन्हा उमेदवारी देणार का, याबद्दल शंका उपस्थित होत आहे. दुसरीकडे, ठाकरे गटासह काँग्रेसनेही या मतदारसंघासाठी चाचपणी सुरू केली आहे.
मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती असलेले यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनी शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांची साथ धरली. त्यामुळे जाधव दाम्पत्यावर बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी ओढवलेले ईडी कारवाईचे संकट टळले. मात्र, लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि त्यातही आपल्याच मतदारसंघातून कमी मते मिळाल्याने यामिनी जाधव यांच्यासमोर आव्हान उभे ठाकले आहे.
एकेकाळी भायखळा विधानसभा मतदारसंघ (पूर्वीचा चिंचपोकळी ) काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र अ. भा. सेनेने काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले आणि अरुण गवळी विजयी होऊन विधानसभेत गेले. पुढच्याच निवडणुकीत काँग्रेसच्या मधु चव्हाणांनी तेथून विजय मिळवला. मात्र, २०१४मध्ये ‘एआयएमआयएम’चे वारिस पठाण यांनी मुसंडी मारली. त्यानंतर विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या यामिनी जाधव या मतदारसंघातून विजयी झाल्या.
हेही वाचा >>> सरकारच्या योजना फसव्या, लागू होण्याबाबत शंका – शरद पवार
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर यामिनी जाधव यांची विधानसभेची दावेदारीही धोक्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत पुन्हा यामिनी जाधव यांना उमेदवारी द्यायची, अन्य व्यक्तीला रिंगणात उतरवायचे, की मतांची आकडेवारी लक्षात घेऊन जागा वाटपात भायखळा मतदारसंघाला सोडचिठ्ठी देऊन सुरक्षित मतदारसंघ मिळवायचा, असा खल शिंदे गटात सुरू झाला आहे. दुसरीकडे, अरविंद सावंत यांना भायखळ्यातून मिळालेल्या मताधिक्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आशा पल्लवित झाल्या असून येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल झालेले दोन, तर मुळचे शिवसैनिक अशा तिघांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी चुरस लागल्याची जोरदार चर्चा सध्या या परिसरात सुरू आहे. काँग्रेस पक्षालाही आपला जुना मतदारसंघ पुन्हा मिळवण्याचे वेध लागले असून तेथेही उमेदवारांची चाचपणी करण्यात येत असल्याचे समजते.
हेही वाचा >>> बोगस पॅथोलॉजी लॅबवर नियंत्रणासाठी कठोर कायदा – सामंत
सावंत यांना मोठे मताधिक्य
भायखळा मतदारसंघातील मुस्लीम मतदारांची मते मिळविण्यात यामिनी जाधव यशस्वी ठरल्या होत्या. तोच धागा पकडून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील भायखळा, मुंबादेवी आदी भागांतील मुस्लीम बांधवांची मते मिळतील, काँग्रेसमधून शिदे गटात दाखल झालेले मिलिंद देवरा यांच्या पाठबळामुळे अमराठी मतदारांच्या मतांची भर पडेल असा अंदाज बांधून यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले. त्यांच्या सोबत मनसेची फोजही होतीच. परंतु भायखळा विधानसभा मतदारसंघात अरविंद सावंत यांना ८६ हजार २९२, तर यामिनी जाधव यांना ४० हजार ८१७ मते मिळाली. अरविंद सावंत यांना भायखळ्यातून ४५ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले.