ठाणे : ठाणे आणि पालघर लोकसभा मतदारसंघावर दावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचणाऱ्या भाजपला या दोन जिल्ह्यांतील संघटनात्मक ताकद दाखविण्याची रणनिती शिंदेसेनेत आखली जात असून रविवारी रात्री उशिरा ठाणे, पालघरातील २५ हजारांहून अधिक महिलांना एकत्र करत पक्षाने आयोजित केलेल्या सखी महोत्सवापासून भाजपला ठरवून बेदखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
शिंदेसेनेचे आमदार, खासदार असलेल्या मतदारसंघात महिला बचत गटाच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून पद्धतशीरपणे ‘रसद पेरणी’ केली जात आहे. ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईदर, पालघर यासारख्या शहरांमध्ये जिल्हा संघटनेच्या माध्यमातून महिला बचत गटाचे लहान-लहान मेळावे घेऊन त्यांना मदत केली जात आहे. शिंदेसेनेच्या महिला विभागाच्या अध्यक्षा आणि ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांच्याकडे यासंबंधीची जबाबदारी सोपविण्यात आली असून बचत गट, त्यामध्ये कार्यरत असलेल्या महिला तसेच त्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीची माहिती संकलीत करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री कार्यालयातील एका विशेष अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त आहे. महिला बचत गटांच्या एकत्रिकरणासाठी केल्या गेलेल्या या पद्धतशीर आखणीचा निवडणुकांच्या काळात उपयोग करुन घेण्याची रणनिती आता शिंदेसेनेत आखली जात असून रविवारी ठाण्यातील ढोकाळी भागातील हायलॅण्ड पार्क येथील विस्तीर्ण मैदानावर आयोजित करण्यात आलेला सखी महोत्सव हा याच आखणीचा एक भाग असल्याची चर्चा आता रंगली आहे.
शक्तिप्रदर्शन आणि भाजपला इशारा
शिंदेसेनेने अवघ्या दोन-तीन दिवसांत या सखी महोत्सवाच्या आयोजनाची तयारी केल्याचे सांगण्यात येते. ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा अजूनही कायम आहे. ठाणे किंवा पालघर या दोन मतदारसंघापैकी एक मतदारसंघ मिळावा यासाठी भाजप नेते आग्रही असून अलिकडच्या काळात भाजपच्या वाढलेल्या ताकदीचे दाखले यानिमित्ताने दिले जात आहेत. असे असताना शिंदेसेनेने ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईदर तसेच पालघर जिल्ह्यातील काही भागांमधून महिलांना एकत्र करत मोठ्या ताकदीचे प्रदर्शन करताना भाजपला पूर्णपणे या महोत्सवापासून दूर ठेवल्याचे पहायला मिळाले.
शिवसेनेचे समन्वयक नरेश म्हस्के तसेच महिला प्रमुख मिनाक्षी शिंदे यांच्याकडे या महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. दोन ते तीन दिवसांत ठाण्यासह आसपासच्या शहरांमधील महिला कार्यकर्त्या तसेच बचत गटांच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या महिलांना एकत्र करुन हा मेळावा आयोजित करण्यात आला. एखादी निवडणूक सभा वाटावी अशापद्धतीने या मोळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. वेगवेगळे सांस्कृतीक कार्यक्रम, नट-नट्यांच्या उपस्थितीत हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
हेही वाचा – इंडिया आघाडी जिंकली तर नेतृत्व कोण करणार? मल्लिकार्जुन खरगेंनी केला खुलासा
ठाणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार निश्चित झाला नसला तरी महायुतीच्या नेत्यांनी एकत्र येत वेगवेगळ्या ठिकाणी मेळाव्यांचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे उमेदवार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यअहवाल प्रकाशन कार्यक्रमासाठी भाजप, मनसेचे नेते एकत्र आले होते. असे असताना सखी महोत्सवात मात्र भाजप नेत्यांना पद्धतशीरपणे दूर ठेवण्यात आल्याने ठाण्यातील शिंदेसेनेचे हे शक्तिप्रदर्शन चर्चेत आले आहे.