मोहनीराज लहाडे
नगर: भाजपने महाराष्ट्रातील ज्या १४ लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे, त्यामध्ये ‘श्रद्धा आणि सबुरी’चा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सध्या या मतदारसंघात उमेदवारीच्या जुळवाजुळवीची समीकरणे वेगात आकार घेत आहेत. मतदारसंघ राखीव असल्यामुळे जिल्ह्यातील इच्छुकांबरोबरच जिल्ह्याबाहेरील अनेक इच्छुकांचीही या मतदारसंघावर ‘नजर’ आहे. मतदारसंघ मात्र सहकारातील दिग्गज साखर कारखानदारांचे साम्राज्य असलेल्या सहा विधानसभांचा आहे. या कारखानदारांना त्यांच्या साम्राज्यात, संस्थानात लक्ष न घालणारा, हस्तक्षेप न करणारा, खासदार हवा असतो. जो उमेदवार साखर कारखानदारांची ही ‘श्रद्धा आणि सबुरी’ जपतो तोच त्यांच्या पसंतीस उतरतो, असा शिर्डीचा संदेश आहे.
पूर्वीचा हा कोपरगाव मतदारसंघ. सन २००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेत शिर्डी मतदारसंघ राखीव झाला. त्याचवेळी रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी भाजपकडून निवडणूक लढवल्याने आणि त्यांचा पराभव झाल्याने, त्यांच्या पराभवाच्या कारणांनी हा मतदारसंघ देशभर चर्चेत आला. आठवले यांच्या राज्यसभेच्या खासदारकीची मुदत सन २०२६ पर्यंत असली तरी ते अधूनमधून, आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर करतात. त्यांच्या पक्षाचे अधिवेशन, अनेक कार्यक्रमही शिर्डीत होत असतात.
आणखी वाचा-जयंत पाटील यांना शह देण्याकरिता अजित पवारांची सांगलीकडे नजर
या मतदारसंघातील उमेदवारीवर नजर ठेवत पूर्वी शिवसेनेकडून खासदार झालेल्या व नंतर विखे यांचे बोट धरून भाजपमध्ये गेलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आता शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. एकत्रित शिवसेना सोडून भाजपमध्ये गेलेल्या वाकचौरे यांच्या विरोधात त्यावेळी शिवसैनिकांनी आंदोलन केले होते. त्याच पदाधिकाऱ्यांनी वाकचौरे यांच्या ठाकरे गटाकडील उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातूनच वाकचौरे यांचा मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा पक्षप्रवेश करून घेण्यात आला. तत्पूर्वी ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप (नाशिक) शिर्डीतील उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. त्यांनी स्वतःही तसे जाहीर केले होते. परंतु स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबरच्या वादातून आता त्यांच्या नावाची चर्चा मागे पडली आहे.
सध्या मतदारसंघ शिंदे गटाच्या ताब्यात आहे. खासदार सदाशिव लोखंडे एकत्रित शिवसैनेकडून पुन्हा निवडून आले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुरुवातीला त्यांनी एकनाथ शिंदे यांचे विरोधात आंदोलने केली. मात्र काही दिवसातच ते शिंदे गटात सहभागी झाले. मध्यंतरी त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव खासदार सुजय विखे यांच्याकडून आपली कामे अडवली जात असल्याची तक्रार केली होती.
आणखी वाचा-पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या निधी वाटपावरून वाद
शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी भाजपने या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते. केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह यांच्यावर त्याची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी मतदारसंघात मुक्काम ठोकत दौरेही केले, गाठीभेटी घेतल्या, जुन्या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचा प्रयत्न केला. समृद्धी महामार्ग, वंदे भारत रेल्वे, रात्रीची विमानसेवा, कार्गो सेवा, निळवंडे प्रकल्प या माध्यमातून ‘शिर्डी’ला जोडत बांधणीला सुरुवात केली होती. परंतु शिवसेनेतील फुटी नंतर गणिते बदलताना दिसत आहेत. बांधणी सुरु केलेला हा मतदारसंघ भाजप जागा वाटपात शिंदे गटाकडे देणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या मतदारसंघात भाजपकडून अद्याप कोणाचे नाव पुढे आणले गेलेले नाही की उमेदवारीसाठी कोणी दावेही केलेले नाहीत.
या मतदारसंघावर तसे पूर्वीपासून काँग्रेसचे वर्चस्व. केंद्रीय कृषिमंत्री स्व. अण्णासाहेब शिंदे यांनी आपल्या कामातून ठसा उमटवला. स्व. बाळासाहेब विखे यांनी मतदारसंघावर दीर्घकाळ वर्चस्व ठेवले. मध्यंतरी १९९६ मध्ये भीमराव बडदे यांच्या रूपाने तो भाजपकडे व १९९८ मध्ये प्रसाद तनपुरे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडेही आला होता. सध्या या मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार आहेत. त्यातील एक काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे. मात्र सक्षम उमेदवारीसाठी काँग्रेसचा शोध सुरू आहे. भाजपकडे एकमेव विधानसभा मतदारसंघ आहे तो, थोरात यांचे परंपरागत विरोधक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे. त्यामुळे एकापरीने निवडणूक लोकसभेची होणारी असली तरी त्याला थोरात-विखे परंपरागत लढतीचे परिमाण लाभणार आहे.
आणखी वाचा-अकोल्यात पक्षांतराचे वारे, शिवसेना ठाकरे व शिंदे गटाकडे ओढा
साखर कारखानदारांचे साम्राज्य
मतदारसंघ साखर कारखानदारांनी वेढलेला असला तरी त्यातील अकोले व श्रीरामपूर असे दोन विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत. मतदारसंघात विखे-थोरात या दिग्गज नेत्यांसह अकोल्यातील ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (भाजप)- सिताराम गायकर (अजितदादा गट), कोपरगावचे आमदार आशुतोष काळे (अजितदादा गट)-माजी आमदार स्नेहलता कोल्हे (भाजप), श्रीरामपुरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे (बीआरएस)-करण ससाणे (काँग्रेस), नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख (अपक्ष-ठाकरे गट)- माजी आमदार चंद्रशेखर घुले (अजितदादा गट) अशा अनेकांच्या विधानसभा निवडणुकीची समीकरणे गुंतलेली असतात. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होत असतो.