हर्षद कशाळकर
अलिबाग: राजकारणात कधी कोण एकत्र येईल याचा नेम नसतो म्हणतात. याचाच प्रत्यय रायगडकरांना पुन्हा एकदा आला. अलिबाग तालुक्यातील नागाव येथे सुरू असलेल्या जिल्हा चाचणी कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने शेकाप आणि शिवसेना उध्दव ठाकरे गट एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. आगामी राजकीय समीकरणांची ही चाचपणी असल्याची चर्चा सुरू झाली.
ज्या अनंत गीते यांच्यामुळे रायगडातील शेकाप आणि शिवसेना युतीला तडे गेले, तेच अनंत गीते आता शेकापच्या वतीने आयोजित निरनिराळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत. शेकपाच्या वतीने अलिबाग तालुक्यातील नागाव येथे जिल्हा कबड्डी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासह जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, तालुका प्रमुख शंकर गुरव यांनी हजेरी लावली. कबड्डी स्पर्धेला शिवसेना नेत्यांच्या या उपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण याच अनंत गीते यांच्यामुळे पूर्वी जिल्ह्यात असलेली शिवसेना शेकाप युती संपुष्टात आली होती.
हेही वाचा: इम्तियाज जलील : ध्रुवीकरणाच्या टोकावरचा नेता
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत शेकापने अनंत गीते यांना पाठींबा दिला होता. त्यामुळे ते बॅरीस्टर ए. आर. अंतुले यांचा पराभव करून निवडून आले होते. मात्र रायगडचे खासदार म्हणून निवडून गेल्यावर शेकापला विसरले. त्यांनी शेकापने सुचवलेली कामे केली नाहीत अशी धारणा त्यावेळी शेकाप नेत्यांची होती. त्यामुळे स्थानिक पातळीवर शेकापने शिवसेनेशी काडीमोड घेतला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेण्याचे धोरण शेकापने स्वीकारले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांना शेकापने पाठींबा जाहीर केला होता. त्यामुळे या निवडणुकीत अनंत गीते यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. गीते यांच्या या पराभवात शेकापचा मोठा वाटा होता.
अनंत गीते यांना ज्या शेकापमुळे पराभवाला सामोरे जावे लागले. त्याच शेकापशी जुळवून घेण्याचे धोरण आता गीते यांनी अवलंबिले असल्याचे दिसून येत आहे. याला स्थानिक राजकीय परीस्थिती कारणीभूत ठरली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संबध प्रचंड ताणले गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी कायम ठेवण्यास शेकाप नेते फारसे इच्छुक दिसून येत नाही. त्यामुळे शेकाप नव्या सहकाऱ्यांच्या शोधात आहे. दुसरीकडे शिवसेनेत फूट पडल्याने पक्षाची ताकद विभागली गेली आहे. तीन आमदारांसह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सोडून गेल्याने पक्ष अडचणीत सापडला आहे. अशावेळी पक्षाची वाताहत टाळण्यासाठी शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला एका भक्कम सहकाऱ्याची आवश्यकता आहे. त्यामुळे गीते यांनी शेकापच्या बाबत सामोपचाराचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा: पुणे काँग्रेसची मरगळ कधी दूर होणार ?
जिल्हा निवड कबड्डी चाचणी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा याचे निमित्त ठरला आहे. मात्र आगामी राजकीय समीकरणांचे हे संकेत असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. आपल्या अस्तित्वासाठी झटणाऱ्या या दोन पक्षाच्या युती होणार का हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट होऊ शकणार आहे.
हेही वाचा: कोल्हापूरातील निस्तेज मनसेमध्ये चैतन्य जागवण्याचे राज ठाकरे यांच्यासमोर आव्हान
जिल्ह्यातील शेकापची राजकीय परिस्थिती
रायगड जिल्हा हा एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पक्षाचे पाच आमदार रायगड जिल्ह्यातून निवडून विधानसभेवर जायचे. मात्र गेल्या काही वर्षात या पक्षाला उतरती कळा लागली, गेल्या विधानसभा निवडणुकीत तर पक्षाचा एकही आमदार जिल्ह्यातून निवडून आला नाही. त्यानंतर झालेल्या नगरपंचायत निवडणुकीतही पक्षाला फारसे यश आलेले नाही. त्यामुळे जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत पक्षाचे वर्चस्व कायम राहावे यासाठी पक्षाचे प्रयत्न असणार आहेत. मात्र त्यासाठी त्यांना एका विश्वासू सहकारी पक्षाची गरज भासणार आहे.