सौरभ कुलश्रेष्ठ

मुंबई : शिवसेनेचे युवराज व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा वरकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून आखण्यात आला तरी शिवसेनेचे हिंदुत्व अधोरेखित करत त्याआधारे मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांच्या मतपेढीत शिवसेनेचा टक्का टिकवण्याची ती खेळी असल्याचे मानले जात आहे. भाजपचे कट्टर समर्थक वगळता इतर उत्तर भारतीयांना हिंदुत्वाच्या आधारे आपल्याकडे वळवण्याचा आणि त्यातून उत्तर भारतीयांची मतपेढी पूर्णपणे भाजपकडे जाऊ देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न शिवसेनेने सुरू केला आहे.

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांची मतपेढी हिंदुत्वाच्या आधारे काबीज करण्याची आखणी भाजपने केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर भारतीयांचे मेळावे आणि त्यातील आक्रमक भाषणे व त्यांना मिळालेला प्रतिसाद ही शिवसेनेसाठी चिंतेची बाब झाली आहे. मुंबईत मराठी मतदारांच्या बरोबरीने आता गुजराती व उत्तर भारतीय मतदार हे निवडणुका जिंकण्यात निर्णायक भूमिका पार पाडतात. २०१७ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुका, विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकांमध्ये त्याची प्रचीती शिवसेनेला आली आहे. पूर्वी १९९२ मधील दंगलीत शिवसेनेमुळे वाचल्याची भावना उत्तर भारतीयांमधील हिंदुत्ववाद्यांमध्येही होती. मुंबईत शिवसेनेची ही संरक्षकाची प्रतिमा खोडून काढून आपणच हिंदुत्वाचे खरे कैवारी असल्याचा आक्रमक प्रचार भाजपने सुरू केला आहे. त्याला उत्तर देण्यासाठीच आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा पार पडला आहे.

आदित्य ठाकरे यांनी बुधवारी अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेतले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, राजन विचारे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर अशी खाशा नेत्यांची फळी आणि शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. आदित्य ठाकरे यांनी ही राजकीय नव्हे तर तीर्थयात्रा असे विधान केले असले तरी या दौऱ्यात शिवसेनेने मोठ्या प्रमाणात राजकीय शक्तीप्रदर्शन केले. अयोध्येत आदित्य ठाकरे यांनी इस्काॅन मंदिर, रामलल्ला, हनुमान गढीला भेट दिली. सायंकाळी शरयूच्या किनाऱ्यावर आदित्य यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्याने त्यात नशिबाने साथ द्यावी यासाठी आला आहात का, या प्रश्नावर निवडणुका कोणत्याही असोत नशीब रोजच पाठिशी हवे असते. चांगले काम करण्यासाठी रामलल्लाचे आशीर्वाद आवश्यक असतात. ते घेण्यासाठीच अयोध्येत आलो, असे उत्तर त्यांनी दिले.

आदित्य ठाकरे यांच्या या उत्तरामुळे हिंदुत्ववादी उत्तर भारतीयांची मुंबईतील मतपेढी सहजासहजी भाजपला हरण्यास शिवसेना तयार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यापुढच्या काळात हिंदुत्व अधोरेखित करत मुंबईतील उत्तर भारतीय मतदार काही प्रमाणात तरी आपल्याकडे वळावा यासाठी शिवसेना आपल्या भात्यातून कोणते नवीन अस्त्र काढणार याबाबत उत्सुकता आहे.

Story img Loader