संतोष प्रधान
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप वा शिंदे गटाने कितीही आक्रमक भूमिका घेतली तरी शिवसेना माघार घेणार नाही हा संदेश देतानाच मराठी, गुजराती, हिंदी आणि मुस्लिमांना साद घालत मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा भगवा फडकविण्याचा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारच्या मेळाव्यातून केला. शिवसेनेसाठी ही अस्तित्वाची लढाई असून, मुंबई जिंकून पक्ष पुन्हा मजबूत करण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न आहे.
दसरा मेळाव्यावरून राजकीय तसेच कायदेशीर वाद सुरू असतानाच शिवसेनेच्या गट प्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. भाजपला मराठी तसेच गुजराती आणि उत्तर भारतीयांचे समर्थन लाभते. या बळावरच २०१४ पासून भाजपने मुंबईत बस्तान बसविले. यापूर्वी उत्तर भारतीय, मुस्लीम हे काँग्रेसला समर्थन करीत असत. हे लक्षात घेऊनच ठाकरे यांनी मराठी माणसाला साद घातलीच. पण त्याचबरोबर गुजराती, उत्तर भारतीय तसेच मुस्लिमांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. फक्त मराठी मतांवर मुंबई महापालिकेच्या सत्तेचे गणित जमणार नसल्यानेच ठाकरे यांनी अमराठी तसेच मुस्लिमांना भावनिक आवाहन केले.
हेही वाचा… Maharashtra Breaking News Live : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच क्लिकवर!
मुस्लिमांमध्ये भाजपच्या विरोधात नाराजी किंवा अस्वस्थता आहे. त्याचा लाभ उठविण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न आहे. मुंबईतील काही भागांमध्ये मुस्लिमांची मते निर्णायक असतात. काँग्रेस व राष्ट्रवादीसमावेत शिवसेनेने महाविकास आघाडी केल्याने मुस्लिमांचा शिवसेनेवरील राग कमी झाला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा सारा रोख हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर होता. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई दौऱ्यात अमित शहा यांनी शिवसेनेला जमीन दाखविण्याचे आवाहन केले होते. त्यामुळेच ठाकरे यांनी शहा यांना आव्हान दिले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीला जेवढा विलंब होईल तेवढे भाजप व शिंदे गटाला हवेच आहे. कारण तोपर्यंत शिवसेनेची सहानुभूती कमी होईल व सरकारने घेतलेल्या निर्णयांचा फायदा होईल, असे भाजपचे गणित आहे. यातूनच ठाकरे यांनी महिनाभरात निवडणूक घेऊनच दाखवा, असे आव्हान शहा यांना दिले.
हेही वाचा… मोठी बातमी! शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा होणार नाही; पालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारली!
भाजपबरोबर युतीत शिवसेना २५ वर्षे सडली, असे २०१७ मध्ये महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे यांनी विधान करूनही पुढे २०१९च्या लोकसभा आणि विधानसभेत शिवसेनेने भाजपशी युती केली होती. या वेळी या विधानाचा पुनरुच्चार करतानाच नसुती सडली नाही तर कुजली असे सांगत यापुढे भाजपशी आरपारची लढाई असेल, असेच संकेत दिले.
बाळासाहेबांच्या नावावरून भाजपला टोला
भाजप आणि एकनाथ शिंदे गट हे सातत्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करतात. त्यावरच भाजपचा ‘कमळाबाई’ हा उल्लेख बाळासाहेबांनीच केला होता याची आठवण ठाकरे यांनी करून दिली. तसेच ‘बाप पळविणारी टोळी’ हा शिंदे गटाला वर्मी बसेल, असा घाव घातला.
हेही वाचा… स्वतंत्र विदर्भासाठी जनमत चाचणी करा, राज ठाकरे यांनी विदर्भवाद्यांच्या जखमेवर मीठच चोळले
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना विरुद्ध भाजप आणि शिंदे गटातील संघर्ष वाढत जाणार हे नक्कीच आहे. दसरा मेळाव्याला परवानगी नाकारल्यास शिवसेना अजून आक्रमक होत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करेल. दसऱ्याच्या दिवशी ॲानलाईन भाषण करून उद्धव ठाकरे भाजप व शिंदे गटावर टीकाटिप्पणी करण्याची संधी सोडणार नाहीत.