यवतमाळ : विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपने संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे, तर काँग्रेसने जिल्ह्यात निरीक्षक पाठवून तयारीचा आढावा घेतला. शिवसेना (शिंदे) पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी वज्रमुठ बांधली गेली.
विधानसभा निवडणुकीचा धुराळा खाली बसताच सध्या शांत असलेल्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना (शिंदे) या पक्षांनी पुढाकार घेतला आहे. या पक्षांनी जिल्ह्यात संघटना बांधणीवर भर दिला असून, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीतून मोर्चेबांधणी सुरू आहे. तिन्ही पक्षांच्या बैठकींमधून नेत्यांनी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासोबतच तरुणांना राजकारणात वाव देण्याची भाषा केल्याने पक्षाच्या निर्णय प्रक्रियेकडे तरुण नेत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
शिवसेनेचे नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी पदाधिकाऱ्यांची विधानसभानिहाय मॅरेथॉन बैठक घेतली. पदाधिकाऱ्यांच्या परिसरात संघटनेची स्थिती तसेच सदस्य नोंदणी अभियान या मुद्द्यावर मार्गदर्शन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्कलनिहाय नियोजन तयार करण्यात आले. शासनाने केलेली कामे, आपापल्या भागात झालेल्या विकासकामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. महायुती असली तरी जिल्ह्यात पक्ष अधिक मजबूत करण्यावर शिवसेना (शिंदे) पक्षाचा भर आहे. आठ तास चाललेल्या या बैठकीत ‘आपरेशन टायगर’चाही उल्लेख झाला. आगामी काळात अनेक मोठे नेते शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तसेच पक्षात संघटनात्मक बदल करण्याचे संकेतही वरिष्ठांनी दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीतील प्रचंड यशानंतर भाजप संघटनात्मक बांधणीसाठी तळागळात पुन्हा सक्रिय झाला आहे. पक्षाने संघटन मजबुतीसाठी अनेक नवे निकष लावून पहिल्या फळीतील दिग्गज नेत्यांना धक्का दिला आहे. एकापेक्षा अधिक जिल्हाध्यक्ष, जिल्हाध्यक्षपदासाठी ५० वर्षांच्या आतील वयाची अट यामुळे दिग्गजांमध्ये अस्वस्थता आहे. निकष बदलांमुळे वर्षांनुवर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे. शहराध्यक्ष निवडीच्या निकषातही बदल केला आहे. १०० बुथमागे एक मंडळ अध्यक्ष, अशी नवी रचना केली आहे. त्यामुळे यवतमाळ शहरात पूर्व व पश्चिम असे दोन शहराध्यक्ष होणार आहे. याशिवाीय वणी ग्रामीणमध्येही दोन शहराध्यक्ष होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक राजकीय नुकसान झालेल्या काँग्रेस पक्षानेही मरगळ झटकून संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. काँग्रेसचे निरीक्षक आमदार संजय मेश्राम यांनी वरिष्ठ नेत्यांना बाजूला ठेवून केवळ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी निरीक्षकांना पक्षातील नेत्यांचे कुठे चुकत आहे, हे मनमाकळेपणाने सांगितले. मेश्राम यांनी विधानसभानिहाय आढावा घेताना थेट त्या तालुक्यांत जाऊन परिस्थिती जाणून घेतली. अनेक वर्षांनंतर पक्ष निरीक्षकाने थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उचललेले पाऊल काँग्रेसला एकसंघ करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, अशी चर्चा या दौऱ्यांनतर काँग्रेसमध्ये आहे.
ठाकरे गट, शरद पवार गट माघारले
महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने जिल्ह्यात संघटनाबांधणीवर भर दिला असताना शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे पक्ष अद्याप सक्रिय व्हायचे आहे. ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी पक्ष सोडून जात असल्याने पक्षात अस्वस्थता आहे, तर शरद पवार गटाला दिशा देणारा नेताच सध्या जिल्ह्यात नसल्याचे चित्र आहे.