मुंबई : विधानसभा निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ हा दिलेला नारा चांगलाच गाजला होता. त्याच धर्तीवर एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने एक‘नाथ’ हे तो सेफ है, असे अभियान राबविले आहे.
राज्याचे मुख्यमंत्रीपद भाजपकडे जात असल्याचे लक्षात येताच शिवसेना शिंदे गटातील काही नाराज नेत्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दबावतंत्रासाठी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वर एकत्र जमण्याचे आवाहन केले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर दबाव टाकण्यासाठी करण्यात आलेले हे आवाहन प्रसिद्ध होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘माझ्या सर्मथनासाठी अशा प्रकारे ‘वर्षा’वर कोणीही एकत्र जमू नये’, असा आदेश देत अतिउत्साही कार्यकर्त्यांना ‘वर्षा’ वर येण्यापासून रोखले. याच वेळी शिवसेनेकडून एक‘नाथ’ है तो सेफ है, असा संदेश समाज माध्यमावरून पसरविण्यास सुरुवात झाली. पक्षाच्या प्रवक्त्या मनीष कायंदे यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर याची माहिती दिली.
मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेचे दबावतंत्र होते. अतिउत्साही पदाधिकाऱ्यांच्या या आवाहनावर शिंदे यांनी समाजमाध्यमावर (एक्स) तात्काळ संदेश प्रसिद्ध करून पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या.