वायव्य मुंबई मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाने अखेर माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांची उमेदवारी जाहीर केली. विशेष म्हणजे या मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर तसेच वायकर हे दोघेही गैरव्यवहार प्रकरणी ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे गेले आहेत. यापैकी वायकर यांनी टोपी बदलल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
अंधेरी, गोरेगाव. दिंडोशी, जोगेश्वरी, वर्सोवा अशा पसरलेल्या वायव्य मुंबई मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाने आमदार रविंद्र वायकर यांची उमेदवारी जाहीर केली. गेल्याच महिन्यात वायकर यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात उडी मारली होती. या मतदारसंघाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. प्रकृतीच्या कारणास्तव आधी कीर्तीकर यांनी असमर्थता व्यक्त केली होती. पण नंतर त्यांची लढण्याची तयारी होती. या साऱ्या घडामोडींमध्ये त्यांचे पुत्र अमोल यांना शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी दिल्याने गजाभाऊंचे नाव मागे पडले. आधी आपण पक्षादेशाप्रमाणे मुलाच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे कीर्तीकर यांनी जाहीर केले होते. पण नंतर मुलाच्या ईडी चौकशीवरून त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला होता.
हेही वाचा : सुषमा स्वराज यांचेच माझ्यावर संस्कार, तुमच्या अपेक्षा पूर्ण करणार; बन्सुरी स्वराज यांची भावनिक साद
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात खिचडी घोटाळ्यात ईडीने चौकशी सुरू केली आहे. अमोल यांची उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी त्यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केले. यामुळेच अमोल कीर्तीकर यांना अटक झाली तरी तेच उमेदवार असतील, असे संजय राऊत यांनी जाहीर केले होते.
रविंद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचा एकेकाळचे अत्यंत निकटवर्तीयांमध्ये मानले जात असत. मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ताब्यात असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे लागोपाठ तीन वर्षे सोपविण्यात आले होते. फडणवीस सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाल्यावर वायकर यांच्याकडे गृहनिर्माण खात्याचे राज्यमंत्रीपदाबरोबरच रत्नागिरी या शिवसेनेसाठी महत्त्वाच्या असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले होते.
हेही वाचा : खलिस्तानसमर्थक अमृतपाल सिंग तुरुंगातून निवडणूक लढवू शकतो का?
वायकर यांनी जोगेश्वरीत उभारलेल्या क्लब आणि पंचतारांकित हाॅटेलमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच रश्मी ठाकरे आणि वायकर कुटुंबियांचे अलिबागमध्ये बंगले असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. अलीकडे वायकर यांची ईडीकडून चौकशी झाली होती. वायकर यांना अटक होणार अशीच चर्चा होती. या प्रकरणात वायकर आणि त्यांच्या पत्नीच्या विरोघात गुन्हा दाखल झाला होता. अटकेच्या भीतीमुळे वायकर भयंकर अस्वस्थ होते. पत्नीलाही अटक होऊ शकते हे लक्षात आल्यावर त्यांनी तलवार म्यान केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संधान साधून दिलासा मिळविला. सर्वोच्च न्यायालयात क्लबचे प्रकरण सुनावणीसाठी आले असता मुंबई महानगरपालिकेने वायकर यांच्या बाजूने भूमिका घेतल्याने तेव्हाच वायकर पक्षांतर करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. शेवटी अटक टाळण्यासाठी वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
हेही वाचा : कलम ३७० वर काँग्रेसचे मौन तरीही आम्ही समजून घेतोय; ओमर अब्दुल्लांचं विधान
शिंदे यांनी वायव्य मुंबई मतदारसंघातून वायकर यांना रिंगणात उतरविले आहे. मध्यंतरी चित्रपट अभिनेता गोविंदा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्त्ने त्यांना उमेदवारी देण्याची चर्चा होती. पण गोविंदा निवडून येणे कठीण असल्याने शेवटी वायकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.