यवतमाळ : जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार, त्यातील एक कॅबिनेट मंत्री असूनही यवतमाळचे पालकमंत्रिपद खेचून आणत येथे शिवसेना (शिंदे)च मोठा भाऊ असल्याचे स्पष्ट झाले. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना यवतमाळचे पालकमंत्रिपद, तर भाजपचे मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांना चंद्रपूरसारख्या ‘हेवीवेट’ जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. राजकीय महत्त्व असलेल्या नाईक बंगल्याचा अपेक्षाभंग झाल्याने इंद्रनील नाराज असल्याची चर्चा त्यांच्या समर्थकांमध्ये आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यात सर्व पक्षांना धूळ चारली असताना यवतमाळात मात्र भाजपला हातच्या दोन जागा गमवाव्या लागल्या. काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा)ने यवतमाळ व वणी मतदारसंघात भाजपला झटका दिला. सत्ताधारी महायुतीचे जिल्ह्यात पाच आमदार आहेत. महायुतीतील तिन्ही पक्ष अनुक्रमे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात स्थान मिळाले. विदर्भात एकमेव यवतमाळ जिल्ह्याचे तब्बल तीन आमदार मंत्री झाले. त्यामुळे पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी लागेल, याबाबत रस्सीखेच होती.
आणखी वाचा-वाशीम जिल्ह्याचे पालकत्व ६३० कि.मी.वर
राठोड हे २०१४ पासून (दीड वर्षांचा अपवाद वगळता) सलग यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मात्र यावेळी राज्यात भाजपने मुसंडी मारल्याने त्याचे परिणाम पालकमंत्रिपदावरही होईल आणि भाजप यवतमाळचे पालकमंत्रिपद स्वत:कडे ठेवेल, अशी चर्चा होती. नियोजन समितीच्या निधी वितरणात समानता आणि सुसूत्रता यावी, यासाठी भाजपचाच पालकमंत्री द्यावा, असा रेटा भाजपच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे लावला होता. मात्र मंत्रिमंडळात ज्याप्रमाणे गेल्यावेळचे मृद व जलसंधारण हे खाते मिळाले, त्याच न्यायाने यवतमाळचे पालकमंत्रिपदही आपल्याच वाट्याला येईल, असे सुतोवाच महिनाभरापूर्वी राठोड यांनी केले होते. त्यांचे म्हणणे अखेर खरे झाले. हा भाजपचे आमदार आणि स्थानिक नेत्यांना धक्का मानला जात आहे.
पालकमंत्रिपद नाही, पण ध्वजारोहणाची संधी
जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांना पालकमंत्रिपद दिले जाईल, अशी चर्चा होती. मात्र इंद्रनील नाईक यांचा अपेक्षाभंग झाला. वाशीम जिल्हा पालकमंत्रिपदासाठी राठोड यांच्या नावाला शिवसेनेच्या आमदार भावना गवळी यांच्याकडूनच विरोध झाल्याने यावेळी वाशीम जिल्ह्याची जबाबदारी नाईक यांना मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, येथे राष्ट्रवादीचेच मंत्री हसन मुश्रीफ यांची नियुक्ती झाल्याने पुसदमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि नाईक बंगल्यात नाराजी व्यक्त होत आहे. पुसद, वाशीम हा बंजाराबहुल भाग असल्याने वाशीमच्या पालकमंत्रिपदी भविष्यात नाईक यांनाच संधी मिळेल, अशी अपेक्षा त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत. त्यांना पालकमंत्रिपदाची संधी मिळाली नसली तरी प्रजासत्ताक दिनी ते अमरावती येथे ध्वजारोहण करणार आहेत.