दिगंबर शिंदे

सांंगली : ‘वक्त से पहले, तकदीरसे जादा कुछ नही मिलता’ असे कायम सांगणारे दुष्काळी भागातील पाणीदार आमदार अशी ओळख निर्माण करणारे अनिल बाबर यांच्या अकाली निधनाने दुष्काळी भागात शोककळा पसरली आहे. सामान्य माणूस म्हणून राजकीय क्षेत्रात आलेल्या आमदार बाबर यांना पंचवीस वर्षापुर्वी जनतेने ‘एक व्होट, एक नोट ’देउन विधानसभेत प्रतिनिधी म्हणून पाठवले. जनतेचा विश्‍वास सार्थ ठरवत दुष्काळाशी झगडणार्‍या शेतकर्‍यांसाठी टेंभू योजनेचे स्वप्न सत्यात उतरवून ‘पाणीदार आमदार’ ही बिरूदावली मिरवली.

अनिलराव बाबर यांचा १९७२ च्या दुष्काळामध्ये गार्डीच्या सरपंचपदी निवड होऊन त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्याचवेळी झालेल्या खानापूर पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सदस्य म्हणून ते निवडून आले. पुढे १९७९ मध्ये सांगली जिल्हा परिषदेवर काँग्रेस पक्षातर्फे ते निवडून येऊन बांधकाम समिती सभापतिपदी त्यांची निवड झाली. १९८२ ते १९९० अखेर त्यांनी खानापूर तालुका पंचायत समितीचे सभापतिपद भूषविले. पंचायत समिती, जिल्हा परिषदेमध्ये काम करीत असताना बाबर यांनी ग्रामीण भागातील रस्ते, शाळाखोल्यांचे बांधकाम व दुरुस्ती, पाझर तलाव, नालाबंडिंग इत्यादी जलसंधारणाची कामे तसेच शासनाच्या ग्रामीण विकासाच्या विविध योजनांची तळागाळापर्यंत अंमलबजावणी करण्यासाठी तळमळीने काम केले.

हेही वाचा… शिवसेना आमदार अनिल बाबर यांचं आकस्मिक निधन, वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भाकुचीवाडी तलाव होत असताना भेंडवडे गावाचे पुनर्वसन करावे लागत होते. त्या कालावधीत सभापती असताना संपूर्ण गावाचे पुनर्वसन करण्याकरिता शासनाच्या धोरणात बदल करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे भाकुचीवाडी प्रकल्पाला पुनर्वसन कायदा लागू झाला व सर्व गावाच्या संमतीने भाकुचीवाडी प्रकल्पाचे काम मार्गी लागले, तसेच ढवळेडर तलाव, येरळा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांच्या उभारणीत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

बाबर यांचा प्रचंड जनसंपर्क व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात केलेल्या कामामुळे १९९० मध्ये खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे ते निवडून आले. या निवडणुकीत जनतेने त्यांना ‘एक नोट ,एक व्होट’ देऊन विजयी केले होते. बहुदा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असावा. त्यामुळेच जनतेच्या मतावर आणि निधीवर निवडून आलेले आमदार अशी त्यांची त्या काळात ख्याती होती. ती अखेरपर्यंत कायम राहिली. लोकांनी केलेले प्रेम आपल्या कायम स्मरणात राहील आणि त्यातून उतराई होण्यासाठीच या भागातील माणूस उभा राहिला पाहिजे यासाठी मी टेंभू योजना मांडली असे आमदार बाबर नेहमी म्हणत.

हेही वाचा… राज्यातील भाजपच्या मंत्र्यांना लोकसभेची उमेदवारी?

या काळात विधिमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी खानापूर आटपाडी तालुययातील दुष्काळी भागाला कृष्णेचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यातूनच त्यांनी टेंभू योजनेची मांडणी केली. या योजनेच्या पूर्ततेसाठी त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले. त्यामुळेच खानापूर आटपाडी सह टेंभूच्या कार्यक्षेत्रातील लोकांनी त्यांना टेंभू योजनेचे जनक अशी उपाधी दिली. त्यातूनच ते पाणीदार आमदार म्हणून ओळखले जाऊ लागेल.

मतदारसंघामध्ये रस्ते, वीज, जलसंधारण अशी अनेक कामे केली., पाणी, शेती, आरोग्य, रस्ते आदी पायाभूत सुविधांसाठी त्यांनी प्राधान्याने काम केले आहे. शेती व शेतीपूरक व्यवसाय, पोल्ट्री, यंत्रमाग यांच्या प्रश्नांसंदर्भातही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, देशभरात काम करणार्‍या खानापूर- आटपाडी परिसरातील गलाई बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यास ते नेहमी अग्रेसर असतात. यशवंत सह. साखर कारखान्याचे संचालक म्हणून काही काळ व पुढे संपतराव माने यांच्या निधनानंतर ते चेअरमनपदी निवडून आले होते. सांगली जिल्हा मध्य, सहकारी बँकेवर संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. नॅशनल हेवी इंजिनिअरिंगचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले कार्य केले आहे. जीवन प्रबोधिनीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातही ते काम केले आहे. पंचायत राज्य व्यवस्थेचा त्यांचा गाढा अभ्यास होता.

हेही वाचा… वंचित – महाविकास आघाडीचे सूर जुळणार का ?

अविल बाबर हे १९९० मध्ये काँग्रेस पक्षाकडून विधानसभेत निवडून आले होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांनी शरद पवार यांना साथ दिली होती. १९९९ मध्ये ते राष्ट्रवादीच्या वतीने निवडून आले होते. पण पुढे त्यांचे जिल्ह्यातील नेत्यांशी बिनसले. २०१४ मध्ये बाबर हे शिवसेनेच्या वतीने निवडून आले होते. २०१९ मध्ये पुन्हा शिवसेनेच्या वतीने ते विधानसभेवर निवडून आले होते. शिवसेनेतील बंडात त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती.