धुळे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध पक्षांमधील इच्छुकांनी आपल्या कार्यकर्त्यांची मोट बांधणे सुरु केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांचीही धुळे शहरातून लढण्याची तयारी असल्याने महायुतीतील स्थानिक इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत धुळे शहर मतदारसंघ भाजप-सेना युतीत एकसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला होता. त्यामुळे यावेळीही या मतदारसंघावर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाने तर, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने हक्क सांगितला आहे. ठाकरे गटाकडून धुळे शहर विधानसभा मतदार संघातून हिलाल माळी, माजी महापौर भगवान करनकाळ,डॉ. सुशील महाजन, माजी नगराध्यक्ष महेश मिस्तरी, माजी आमदार शरद पाटील हे इच्छुक आहेत. हिलाल माळी हे मागील निवडणुकीत एकसंघ शिवसेनेचे उमेदवार असताना तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. दुसरे इच्छुक उमेदवार शरद पाटील यांनी याआधी २००९ मध्ये धुळे ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज तथा माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा पराभव करून सर्वांनाच चकित केले होते.

हेही वाचा…विरोधकांकडून आरोपांची राळसत्ताधाऱ्यांना पैसे गोळा करून देण्यासाठीच सुधाकर शिंदे पदावर- अनिल परब

दुसरीकडे, शिंदे गटातर्फे मनोज मोरे, सतीश महाले हे उमेदवारीच्या स्पर्धेत आहेत. धुळे शहर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा दबदबा असल्याने ही जागा महायुतीत शिंदे गटाला सुटण्याची आशा इच्छुकांना आहे. स्थानिकांनी तयारी केली असताना शिंदे गटाचे नंदुरबार जिल्ह्यातील माजी नगराध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी धुळे शहरातून निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे सुतोवाच केल्याने शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये काहीशी अस्वस्थता निर्माण झाली आहे. रघुवंशी यांनी धुळे शहर मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला येणार असल्याचा दावा केल्याने महायुतीतील मित्रपक्षही सावध झाले आहेत.

महायुतीच्या जागा वाटपात धुळे शहराची जागा शिंदे गटालाच सुटणार असल्याचे गृहित धरुन पक्षातर्फे तयारी करण्यात येत आहे. अलिकडेच इतर पक्षांमधील काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने पक्षातील उमेदवारीसाठी इच्छुकांचाही हुरुप वाढला आहे. आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याचा संकल्प सर्वांनी केला असल्याचे माजी आमदार रघुवंशी यांनी सांगितले. पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतल्यास आपण धुळे शहर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले. रघुवंशी यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जात असून महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप या घटक पक्षांमध्येही त्याचे पडसाद उमटले आहेत. या जागेवरुन उमेदवारीसाठी भाजपकडूनही अनेक जण इच्छुक असल्याने त्यांच्या तयारीवर या विधानामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे. महायुतीत अद्याप जागावाटपासंदर्भात कोणतीच बैठक झालेली नसताना घटक पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी परस्पर अशी विधाने करणे योग्य नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

हेही वाचा…राजकीय पक्षांमध्ये संवादाचा अभाव, पातळीत घसरण; उपराष्ट्रपतींची खंत

धुळे शहर मतदारसंघात २५ वर्षांपासून शिवसेना निवडणूक लढवित आहे. यामुळे यावेळीही शिवसेना (शिंदे गट) या मतदार संघातून निवडणूक लढेल. यासाठी तयारीला लागलो आहोत. – मनोज मोरे (जिल्हाप्रमुख, शिवसेना शिंदे गट, धुळे)