अलिबाग- होळी सणापूर्वीच रायगड जिल्ह्यात राजकीय शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी एकमेकांची उणीदुणी काढताना पहायला मिळत आहेत. एकीकडे महायुतीमधील घटक पक्षांत समन्वय वाढविण्यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यात महायुतीमधील वाद विकोपाला गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

उत्सव प्रिय कोकणात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने मुंबई ठाण्यातील रहिवाशी कोकणात दाखल होतात. गावागावात देवी देवतांच्या पालख्या निघतात. होळी पेटवून वाईट प्रवृत्तींचे दहन केले जाते. या निमित्ताने होळीभोवती फेरा धरत एकमेकांच्या नावाने शिमगा केला जातो. म्हणून या उत्सवाला शिमगोत्सव म्हणूनही संबोधले जाते.

होळी सणाला अजून काही दिवस शिल्लक असले तरी रायगड जिल्ह्यात मात्र राजकीय शिमगोत्सवाला जोरदार सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकमेकांविरोधात राजकीय शेरेबाजी करताना दिसत आहेत. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद यास कारणीभूत ठरले आहे.

राज्यात महायुती सरकारच्या स्थापनेनंतर आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने यावर आक्षेप घेतला. जाळपोळ करून, महामार्ग रोखून या नियुक्तीचा विरोध केला. शिवसेना शिंदे गटाच्या संतत्प प्रतिक्रियांनंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली. दीड महिन्यानंतरही रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा काही सुटलेला नाही. दोन्ही पक्षांत समेट घडवून आणण्याचे प्रयत्नही सफल होताना दिसत नाही.

काही दिवसांपूर्वी माणगाव येथील एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी क्रिकेटचे मैदान असो अथवा पालकमंत्रीपद पंचाचा निर्णय अंतिम असतो अशी कोपरखळी शिवसेना आमदारांना लगावली होती. हाच धागा पकडून शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी अलिबाग येथील क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात, तटकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. क्रिकेटच्या मैदानातील नियमात बरेच बदल होत आहेत. पंचाचा निर्णय मान्य नसेल तर त्या विरोधात तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पालकमंत्रीपदाच्या निर्णयाबाबत आम्ही तिसऱ्या पंचांकडे दाद मागू असा टोला लगावला. कप्तानाने सर्व खेळाडूंना सोबत घेऊन पुढे जायचे असते, माझे कुटुंब, माझी मुलगी असे करून चालणार नाही. सगळे मलाच पाहिजे असे होणार नाही. येवढ्यावरच न थांबता आमदार थोरवे खासदार तटकरे यांना औरंगजेबाची उपमाही देऊन टाकली. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले.

या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. त्यांनी कोलाड नाक्यावर आंदोलन करत आमदार थोरवे यांच्या पुतळ्याला जोडे मार आंदोलन केले आहे. थोरवे यांचे वागणे औरंगाजेबासारखे आहे. ज्या प्रमाणे औरंगजेबाला संताजी धनाजी पाण्यात दिसायचे तसे थोरवे यांना सगळीकडे खासदार तटकरेच दिसतात. त्यामुळे भितीमुळे थोरवे काही बडबडत सुटतात, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधूकर पाटील यांनी आमदार थोरवेंवर टीकास्त्र डागले आहे. युतीचा धर्म पाळला म्हणून थोरवे काठावर निवडून आले. यापुढे ते निवडून येऊ देणार नाही, असा थेट इशाराही पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे ऐन होळी सणाच्या तोंडावर रायगड जिल्ह्यात राजकीय शिमगा मात्र जोरात पेटला असल्याचे दिसून येत आहे.

Story img Loader