नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील ऐरोली आणि बेलापूर या दोन मतदारसंघात ७३ हजार दुबार मतदार असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाने केला आहे. दुबार मतदारांसाठी काही राजकीय मंडळी विशेष वाहनांची व्यवस्था करून त्यांना रातोरात गावी पाठवीत आहे. त्यानंतर तातडीने त्यांना पुन्हा मतदान करण्यासाठी नवी मुंबईत आणले जाते, असा आरोप शिंदे गटाने केला आहे.
नवी मुंबई हे शहर ठाणे आणि मुंबईपासून जवळचे आहे. या शहरात ऐरोली आणि बेलापूर हे दोन मतदारसंघ येतात. नवी मुंबईत प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील रहिवाशांचे वास्तव्य अधिक आहे. यातील ऐरोली मतदारसंघातून भाजपकडून गणेश नाईक हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर विजय चौघुले आणि ठाकरे गटाचे एम. के. मढवी निवडणूक लढवीत आहेत. तर बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे निवडणूक लढवीत आहेत. याच मतदारसंघातून गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक हे राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) निवडणूक लढवीत आहेत.
हेही वाचा >>> उरणच्या उमेदवारांना क्रीडांगण सुविधांचा विसर, मतदारसंघात खेळाच्या मैदानांचा अभाव
शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख तथा माजी नगरसेवक किशोर पाटकर यांनी नवी मुंबईत एकूण ७३ हजार २३२ मतदार दुबार असल्याचा दावा केला आहे. यामधील ऐरोली विधानसभा क्षेत्रात ४१ हजार ५४६ आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रात ३१ हजार ६८६ मतदारांची दुबार नावे नोंदविल्याचे म्हटले आहे. त्यांनी याबाबत बेलापूर निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे.
माझ्याकडे याबाबतची तक्रार अद्याप प्राप्त झाली नाही. परंतु अशी तक्रार आली असेल तर त्याची पडताळणी करून त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठविला जाईल. – अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी.
ऐरोली मतदारसंघात दुबार नावे
पाटण- ६,११४, वाई- ४,५४३, कोरेगाव- ३, ८९६, दक्षिण कराड- ४,५९५, सातारा- ५,००२, जुन्नर- १,७९५, आंबेगाव- १,४९०, भोर- ३,२०३ – एकूण ४१,५४६.
बेलापूर मतदारसंघातील दुबार नावे
पाटण- ४,४२३, वाई- ३,३७२, कोरेगाव ३,२४४, दक्षिण कराड-३,६२९, सातारा- ३,५३०, जुन्नर- १,६८८, आंबेगाव-१,३७३, भोर-१,८७८ – एकूण ३१,६८६.