छत्रपती संभाजीनगर : धाराशिव लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेवार म्हणून अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते नाराज आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे समर्थक अर्चना पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करू लागले आहेत.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत म्हणाले, ज्या चिन्हावर मते देऊ नका, असे सांगत होतो, त्याच चिन्हाला मतदान करावे असे सांगताना कार्यकर्ते कचरत आहेत. केवळ चिन्हच नाही तर बहुतांश कार्यकर्ते डॉ पद्मसिंह पाटील घराण्यातील उमेदवारांना विरोध करत होते. आता त्यांनाच पुन्हा मतदान करा असे सांगताना कार्यकर्त्यांची अडचण होणार आहे. त्यांच्यामध्ये रोष आहे, हे खरेच आहे.’
हेही वाचा…अकोल्यात काँग्रेस उमेदवाराची ‘संघ परिवार’ पार्श्वभूमी केंद्रस्थानी, वंचितकडून टीकेची झोड
परंडा विधानसभा मतदारसंघात तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे यांचा पराभव केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी विरोधात प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना आता घड्याळ चिन्हावरील उमेदवारास पुन्हा मतदान करा, असे त्यांना सांगावे लागणार आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून धनंजय सावंत यांना उमेदवारी द्यावी अशी शिफारस तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.
हेही वाचा…काँग्रेसला अपेक्षा २००४ च्या ‘सोनिया मॅजिक’ची, राहुल गांधींना शक्य आहे का चमत्कार?
हा लोकसभा मतदारसंघ परंपरेने शिवसेनेचा असतानाही येथील जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला दिल्याने नवे गोंधळ निर्माण झाले आहेत. दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उस्मानाबाद मतदारसंघात पोहचलेल्या अर्चना पाटील यांचे त्यांच्या समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले. तुळजापूर येथे त्यांना त्रिशुळही भेट देण्यात आला. या वेळी भाजपचे आमदार व अर्चना पाटील यांचे पती राणाजगजीतसिंह पाटील यांचीही उपस्थिती होती. उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यांना उमेदवारी देण्यासाठी औशाचे आमदार अभिमन्यू पवार आणि बार्शीचे राजभाऊ राऊत यांनी पुढाकार घेतला होता असे समजते. दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्याचे धनंजय सावंत यांनीही मान्य केले.