अलिबाग: रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. महाड येथील दोन्ही गटात वाद झाल्यानंतर आता लोणेरे येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाला विरोध करण्याची भूमिका शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने घेतली आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी ठाकरे गटाला थेट इशारा दिला आहे. बाळासाहेबांची शिवसेना काय असते ते दाखवतो असा टोला त्यांनी उध्दव ठाकरे गटाला लगावला आहे.
दोन दिवसांपूर्वीच महाड येथे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांना भिडले होते. आमदार भरत गोगावले यांनी नागपूर येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने शिवाजी महाराज चौकात आंदोलनाची हाक दिली होती. मात्र याची कुणकूण लागताच शिवसेना शिंदे गटाचे शेकडो कार्यकर्ते ठाकरे गटाच्या आधीच शिवाजी महाराज पुतळ्या जवळ जमले. दोन्ही गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. पोलीसांनी हस्तक्षेप करत ठाकरे गटाला आपल्या कार्यालयाकडे परतण्यास सांगितले. याच वेळी दोन्ही गट एकमेकांना भिडले. पोलिसांनी शीघ्र कृतीदलाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढचा संघर्ष टळला.
पण आता दोन्ही गटातील संघर्षाचा दुसरा अंक सुरू होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. राज्यसरकारच्या वतीने माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेनेच्या ठाकरे गटाने विरोध दर्शविला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी ही घोषणा केली आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी तीव्र प्रतिक्रीया दिली आहे. हिम्मत असेल तर येऊन दाखवाच, बाळासाहेबांची शिवसेना काय असते तुम्हाला दाखवतो. आमच्या फौजा तयार असतील असा इशारा त्यांनी शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाला दिला आहे. मग खरे शिवसैनिक कोण, दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. त्यामुळे दोन्ही गटातील वाद विकोपाला जाण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.