पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे) पक्षाने पक्षवाढीसाठी व्यूहरचना आखली असून, पहिल्या टप्प्यात शिवसेना (ठाकरे) पक्ष आणि मनसेला दणका दिला जाणार आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या एका माजी आमदाराचे पुत्र; तसेच काही माजी नगरसेवक संपर्कात असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेही (मनसे) माजी नगरसेवक शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पक्षप्रवेश होणार असल्याने पुण्यातील शिवसेना (शिंदे) पक्षाचा ‘आव्वाज’ वाढणार आहे, तर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे पाच माजी नगरसेवक भाजपनिवासी झाले असताना अन्य काही नगरसेवकही शिवसेना (शिंदे) पक्षाच्या वाटेवर जाण्याची शक्यता असल्याने शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापालिका निवडणुकांच्या तयारीसाठी शिवसेना (शिंदे) पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे हे शुकवारी पुणे दौऱ्यावर असून, सासवड येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेमध्ये पक्षप्रवेश करून शिवसेना (शिंदे) पक्षाकडून शिवसेना (ठाकरे) आणि मनसेला दणका दिला जाणार आहे. यापूर्वी शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे आणि प्राची आल्हाट या पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आणि श्वेता चव्हाण हे तीनच नगरसेवक राहिले आहेत.आता शिवसेना (शिंदे) पक्षाने उर्वरित माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांना पक्षात घेण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. त्यानुसार शिवसेना (ठाकरे) पक्षाचे एक माजी आमदार पुत्र; तसेच माजी नगरसेवक हे शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश करणार आहेत. एका माजी आमदाराचे पुत्र आणि काही नगरसेवक हे पक्षाच्या संपर्कात असून, ते पक्षप्रवेश करणार असल्याचे शिवसेना (शिंदे) पक्षाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी सांगितले.

संजय राऊत यांचे दौरे आणि पक्षफूट

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुणे दौरा करून पक्षाच्या बैठका घेतल्यानंतर पक्ष संघटन मजबूत होण्याऐवजी आणखी फूट पडत असल्याचे दिसून येत आहे. दोन आठवड्यांपूर्वी खासदार राऊत यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्या बैठकीला काही माजी नगरसेवक उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी खासदार राऊत यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिलह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे सन्मानपूर्वक वागणूक न मिळाल्याने बैठकीतून निघून गेले होते. त्यामुळे शिवसेना (ठाकरे) पक्षातील अंतर्गत नाराजी उफाळून आली. त्यानंतर सुमारे ४०० ते ५०० कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला. आता एक माजी आमदार पुत्र आणि माजी नगरसेवक हे शिवसेना (शिंदे) पक्षाच्या संपर्कात असून, त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याने शिवसेना (ठाकरे) पक्षाला गळती लागली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) पक्षापुढे अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

मनसे आणि काँग्रेसमधील पदाधिकारीही संपर्कात

शिवसेना (ठाकरे) पक्षाबरोबरच मनसे आणि काँग्रेसमधील काही पदाधिकारी हे शिवसेना (शिंदे) पक्षाच्या संपर्कात आहेत. त्यामध्ये मनसेच्या काही माजी नगरसेवकांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सासवड येथील सभेत संबंधितांचा पक्षप्रवेश होणार आहे.

शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या माजी आमदारांचे पुत्र आणि काही माजी नगरसेवक हे संपर्कात असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुक्रवारी होणाऱ्या जाहीर सभेत त्यांचे पक्षप्रवेश होणार आहेत. याशिवाय मनसेचे माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे काही पदाधिकारीही पक्षात येणार आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्याबरोबरच सोलापूर आणि पंढरपूर येथील काही नेत्यांचा जाहीर सभेत पक्षप्रवेश होणार आहेत. -नाना भानगिरे, शहराध्यक्ष, शिवसेना (शिंदे)