अकोला : विधानसभा निवडणुकीत पश्चिम विदर्भात शिवसेना शिंदे गटाची चांगलीच वाताहत झाली. सातपैकी पाच मतदारसंघात पक्षाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिग्रसमधील विजय व बुलढाण्याच्या काठावर निघालेल्या जागेने शिवसेना शिंदे गटाची लाज राखली. चार ठिकाणी दोन्ही शिवसेनेमध्ये लढाई झाली. त्यातील तीन जागांवर विजय मिळवत शिवसेना ठाकरे गट सरस ठरला. शिवसेना शिंदे गटावर नामुष्की ओढवली असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
महायुतीत जागा वाटपामध्ये शिवसेनेने प्रतिष्ठेचा विषय करून पश्चिम विदर्भातील सात मतदारसंघ मिळवले. कमकुवत उमेदवार, अंतर्गत वाद, विस्कळीत प्रचार व नियोजनाच्या अभावामुळे पक्षाला पाच ठिकाणी मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. अकोला जिल्ह्यातील बाळापूरची जागा मिळवण्यासाठी शिवसेनेने आग्रही भूमिका घेतली होती. मात्र, उमेदवारही भाजपमधून आयात करावा लागला. बळीराम सिरस्कारांच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये अंतर्गत प्रचंड खदखद होती. मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पूर्वसंध्येसह प्रचारात अनेक वेळा उमेदवार व पदाधिकाऱ्यांमध्ये निवडणूक निधीसह अनेक कारणावरून वादाचे प्रसंग उद्भवले. मतदारांपुढे हे सर्व प्रकार घडल्याने पक्षाची प्रतिमा मलिन झाली. महायुतीत कुठलाही समन्वय नव्हता. सिरस्कारांनी सर्वांना गृहीत धरले होते. त्यामुळे बाळापूरमध्ये शिवसेनेला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. सर्वत्र महायुतीचा बोलबाला असतांना बाळापुरात शिवसेनेचे सिरस्कार तिसऱ्यास्थानी घसरले असून शिंदे गटाचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. ही जागा कायम राखण्यात ठाकरे गटाला यश आले.
आणखी वाचा-यवतमाळात कुणबी, मराठा समाजाचे अस्तित्व पणाला, विधानसभा निवडणुकीत धृवीकरणाचे प्रयत्न फसले
वाशीम जिल्ह्यातील रिसोडमध्ये सुद्धा शिवसेनेला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. जुलै महिन्यातच भावना गवळी यांना विधान परिषदेवर संधी दिली असतांनाही त्या विधानसभेच्या रिंगणात उतरल्या होत्या. पक्षातील पदाधिकाऱ्यांसह अनेकांना ते चांगलेच खटकले. भाजपतील माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी केली. महायुतीतील वाद काँग्रेसच्या पथ्यावर पडला. बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक तीन जागा शिवसेनेने लढवल्या. शिवसेनेचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेहकरमध्ये शिंदे गटाला चार हजार ८१९ मतांनी पराभव झाला. ही जागा ठाकरे गटाने जिंकली. सिंदखेडराजा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत झाली. त्याठिकाणी देखील शिवसेना शिंदे गटाचा मोठा पराभव होऊन तिसऱ्या स्थानावर पक्ष घसरला.
बुलढाणा मतदारसंघात अवघ्या ८४१ मतांनी शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटावर निसटता विजय मिळवला. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघ मोठ्या मताधिक्याने कायम राखण्यात शिवसेना शिंदे गटाला यश आले. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. ही जागा देखील शिवसेना ठाकरे गटाने जिंकली. शिंदे गटाचे अभिजीत अडसूळ यांना केवळ २३ हजार ६३२ मते मिळाली. महायुतीमध्ये घटक असतांनाही युवा स्वाभिमान पक्षाने दर्यापूरमध्ये स्वतंत्र उमेदवार दिला होता. विशेष म्हणजे भाजपच्याही अनेक नेत्यांनी स्वाभिमानच्या उमेदवाराला पाठबळ दिल्याने शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसल्याचे चित्र आहे.
आणखी वाचा-यवतमाळात कुणबी, मराठा समाजाचे अस्तित्व पणाला, विधानसभा निवडणुकीत धृवीकरणाचे प्रयत्न फसले
प्रतापराव जाधवांच्या वर्चस्वाला धक्का
केंद्र सरकारमध्ये शिंदे गटाला मिळालेले एकमेव मंत्रिपद प्रतापराव जाधवांच्या रुपाने पश्चिम विदर्भाला देण्यात आले. या भागात पक्षाच्या संघटनात्मक वाढीला त्याचा लाभ होईल, असा अंदाज होता. मात्र, तो अंदाज फोल ठरला. प्रतापराव जाधवांचा गृह मतदारसंघ मेहकरमध्ये सुद्धा शिवसेना शिंदे गटाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. शिवसेनेने लढलेल्या इतर मतदारसंघांमध्ये देखील त्यांचा काही प्रभाव दिसून आला नाही. प्रतापराव जाधवांच्या वर्चस्वाला धक्का लागल्याचे बोलल्या जात आहे.
शिवसेना शिंदे गटाने पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली. कुठे पक्ष कमी पडला असेल, तर त्याचे निश्चित वरिष्ठ पातळीवर आत्मचिंतन केले जाईल. -रामेश्वर पवळ, राज्य समन्वयक, शिवसेना.