मुंबई : कोकण आणि शिवसेनेचे वर्षानुवर्षाचे एक अतूट नाते होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कोकणातील गावे किंवा पाड्यांवर झळकलेले बघायला मिळायचे. पण या निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग तसेच रायगड या कोकणातील दोन्ही मतदारसंघांमध्ये धनुष्यबाण चिन्ह नसेल.
कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण हे गेली वीस वर्ष निर्माण झालेले समीकरण सिंधूदुर्ग रत्नागिरी मतदार संघात भाजपच्या नारायण राणे यांचे नाव जाहीर झाल्याने किमान लोकसभा निवडणूकीत धनुष्यबाण हे चिन्ह अदृश्य झाले आहे. महायुतीच्या जागा वाटपात शिवसेनेचे अर्थात धनुष्यबाणाचे कोकणातील अस्तित्व कायम राहावे यासाठी शिवसेनेचे मुख्य नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी यासाठी शेवटपर्यत किल्ला लढवला. पण महायुतीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजप तर रायगडचा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याने कोकणात धनुष्यबाण चिन्ह मतदान यंत्रावर यंदा नसेल.
१९९६ मध्ये त्यावेळच्या राजापूर मतदार संघातून शिवसेनेचे सुरेश प्रभू यांनी पहिल्यांदा धनुष्यबाण चिन्हावर विजयी झाले होते. कोकणात तेव्हा लोकसभेचे राजापूर, रत्नागिरी, आणि कुलाबा असे तीन मतदार संघ होते. धनुष्यबाण चिन्हावर १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ मध्ये सुरेश प्रभू विजयी झाले. कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण हे समीकरण तयार झाले. देशात २००८ रोजी झालेल्या मतदार संघ पुर्नरचनेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्हयाचा एक मतदार संघ करण्यात आला. २००९ च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसच्या निलेश राणे यांनी सुरेश प्रभू यांचा पराभव केला. शिवसेना भाजप युतीत २०१४ मधील निवडणूकीत शिवसेनेने पुन्हा या मतदार संघात आपले अस्तित्व निर्माण केले. धनुष्यबाणावर विनायक राऊत यांनी २०१९ मध्ये या मतदार संघावर वर्चस्व कायम ठेवले. दोन वर्षापूर्वी झालेल्या शिवसेनेच्या फुटीनंतर राज्यात सेनेचे दोन गट पडले आहेत. शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्हे दोन्ही मिळाले आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असल्याने या पक्षाचे अस्तित्व कायम राहावे यासाठी शिंदे गट हा मतदार संघासाठी आग्रही होता.
हेही वाचा… ब्राह्मण ते ठाकूर, दलित ते मुस्लिम; उत्तराखंडमध्ये जातीय समीकरणावरच निकालाचे गणित
हेही वाचा… Election 2024: राजकीय पक्षांसाठी काम करणारे पगारी कार्यकर्ते
रत्नागिरी-सिंदुर्गमध्ये भाजपच्या कमळ आणि ठाकरे गटाच्या मशाल या दोघांमध्ये सरळ लढत होणार आहे. रायगड मतदार संघात राष्ट्रवादीच्या तटकरे यांच्या घड्याळ आणि ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्या मशाल चिन्हात सामना रंगणार आहे. मावळ लोकसभा मतदार संघात पनवेल, उरण हे दोन विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या श्रीरंग बारणे यांना उमेदवार मिळाली आहे. त्यामुळे कोकणच्या उत्तर भागात फक्त दोन विधानसभा मतदारसंघात धनुष्यबाण चिन्ह दिसेल. मात्र रत्नागिरी व तळ कोकणात धनुष्यबाण चिन्ह दिसणार नाही.