ठाणे : शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या ठाणे जिल्ह्यातील आमदारांचा ‘गद्दार’ असा उल्लेख करत त्यांना निवडणुकीत पराभूत करण्याची ‘भीमगर्जना’ करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जिल्ह्यात एकही जागा जिंकता आलेली नाही. भिवंडी ग्रामीण, अंबरनाथ, कल्याण पश्चिम आणि कल्याण ग्रामीण या जागांवर उमेदवार विजयी होतील, असा ठाकरे गटाचा दावाही प्रत्यक्षात फोल ठरला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने जिल्ह्यात एकूण १० जागांवर निवडणूक लढवली होती. परंतु या सर्वच जागांवर त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. यामुळे जिल्ह्यात ठाकरे गटाचे ‘पानिपत’ झाल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी घराघरात शिवसेना पोहोचवली. त्यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील शिवसेनेचे अस्तित्व कायम ठेवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यामुळेच शिवसेनेतील बंडानंतर जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्वच आमदारांनी शिंदे यांना समर्थन दिले. यामध्ये आमदार प्रताप सरनाईक, शांताराम मोरे, विश्वनाथ भोईर, डॉ. बालाजी किणीकर या आमदारांचा समावेश होता. परंतु मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांचा ‘गद्दार’ असा उल्लेख करत त्यांना निवडणुकीत पराभूत करण्याची भीमगर्जना उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी केली होती.

हेही वाचा >>>पुणे जिल्ह्यात अजित पवारांचे यश भाजपसाठी आव्हानात्मक

विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीणमध्ये महादेव घाटाळ, कल्याण पश्चिम सचिन बासरे, अंबरनाथ राजेश वानखेडे, कल्याण पूर्व धनंजय बोडारे, डोंबिवली दीपेश म्हात्रे, कल्याण ग्रामीण सुभाष भोईर, ओवळा-माजिवडा नरेश मणेरा, कोपरी-पाचपाखाडी केदार दिघे, ठाणे शहर राजन विचारे, ऐरोलीमध्ये मनोहर मढवी अशा १० जणांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली होती. त्यातील पाच उमेदवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, शांताराम मोरे, विश्वनाथ भोईर, डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरोधात उभे केले होते. मात्र, यासह उर्वरित पाच जागांवरही ठाकरे गटाचा पराभव झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात त्यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उद्धव यांनी उमेदवारी दिली होती. मात्र त्यातही ठाकरे गटाला फारसे यश मिळाले नाही.

हेही वाचा >>>विरोधक मुक्त मतदारसंघाला मुख्यमत्र्यांचे प्राधान्य

एकनाथ शिंदेच ‘ठाणेदार’

लोकसभा निवडणुकीत ठाणे आणि कल्याण मतदारसंघात शिंदे गटाने ठाकरे गटाचा पराभव केला. या निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी तेच ‘ठाणेदार’ असल्याचे दाखवून दिले होते. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला धूळ चारत मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा तेच ‘ठाणेदार’ असल्याचे दाखवून दिले आहे. भिवंडी ग्रामीण, अंबरनाथ, कल्याण पश्चिम आणि कल्याण ग्रामीण या जागांवर उमेदवार विजयी होतील, असा ठाकरे गटाचा दावा होता. प्रत्यक्षात या जागांवरही ठाकरे गटाचा पराभव झाला.

निवडणूक प्रचारात पाठ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे जिल्ह्यात वर्चस्व असून शिवसेनेतील फुटीनंतरही त्यांनी जिल्ह्यातील वर्चस्व कायम ठेवले आहे. यामुळेच शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे शिंदे यांना सातत्याने त्यांच्याच जिल्ह्यात आव्हान देताना दिसत होते. यातूनच ‘मुख्यमंत्र्यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात निवडणूक लढवेन’, अशी घोषणा करत आदित्य यांनी पक्षाला बळ देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु विधानसभा निवडणुकीत आदित्य यांनी जिल्ह्यातील प्रचाराकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena thackeray candidates defeated on ten seats in thane district thane news amy