मुंबई : विधानसभा निवडणुकीत ९५ पैकी केवळ २० उमेदवार निवडून आल्याने नाऊमेद झालेल्या शिवसेनेतील (उद्धव ठाकरे) नेत्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भाषा सुरू केली आहे. ‘मातोश्री’वर विजयी आमदारांच्या बैठकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांचे काम न केल्याचा सूर आळवला गेला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा आग्रह आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी स्वतंत्र लढण्याचा सूर असल्याचे सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र यावर मौन धारण केले आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेनेचा (ठाकरे) धुव्वा उडाला. ठाकरे गटाला किमान ९५ पैकी २० जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसने १०१ जागा लढवल्यानंतरही केवळ १६ जागांवर समाधान मानावे लागले. शरद पवार गटाला सर्वांत कमी १० जागा मिळाल्या आहेत.
मतपत्रिकेसाठी राहुल गांधींची यात्रा; स्वाक्षरी मोहीम राबवणार : नाना पटोले
तिन्ही पक्षांना विरोधी पक्षनेते पद मिळण्यासाठी लागणाऱ्या २९ जागाही निवडून आणता न आल्याने पराजयाचे खापर एकमेकांवर फोडण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या विजयी व प्रमुख नेत्यांच्या बैठकीत दोन्ही मित्रपक्षांचा ठाकरे गटाला फायदा न झाल्याचा आरोप करण्यात आला. रामटेक व सोलापूर दक्षिण या मतदारसंघात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कामे केले नाही, तर सांगोल्यात शरद पवार गटाने ‘शेकाप’च्या उमेदवाराला मदत केल्याचा आरोप आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार पक्षही अशाच प्रकारे ठाकरे गटावर आरोप करीत आहे.
ठाकरे गट द्विधा स्थितीत
‘ईव्हीएम’ यंत्राविरोधात आंदोलन करण्याची भाषा करणारे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते आता एकमेकांवर पराभवाचे खापर फोडत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट हिंदुत्व शिवसेना शिंदे गटाने अंगीकरल्याचा प्रचार होत असताना, आघाडीत सहभागी झाल्याने धड हिंदुत्व सोडता येत नाही की धर्मनिरपेक्षता स्वीकारता येत नाही, अशी द्विधा स्थिती शिवसेना ठाकरे गटाची झाली आहे.