छत्रपती संभाजीनगर : गेल्या १४ वर्षापासून पुरवठ्यातील अडचणींमुळे छत्रपती संभाजीनगरमधील पाणीटंचाईला ‘ भाजप’ जबाबदार आहे, असे चित्र उभे करत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने ‘ लाबाडानो पाणी द्या’ असे घोषवाक्य ठरवून पुढील महिनाभर जाब विचारणारे आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या प्रश्नावर मोर्चाही काढण्यात येणार आहे. अनेक वर्ष महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व होते. गेल्या १४ वर्षात ७२१ कोटी रुपयांची याेजना आता २७५० कोटी रुपयांवर गेली. पण आजही शहरात १० ते १२ दिवसाने पाणी येते.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०२२ साली संभाजीनगर महानगरपालिकेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता. त्यादिवशी फडणवीस यांनी भाजपाचे शासन आल्यास पुढील ६ महिन्यात दररोज पाणी देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र,भारतीय जनता पक्ष आणि गद्दार गटाचे शासन येऊन आज रोजी तीन वर्ष झाले तरीही शहराला १० ते ११ दिवसाला पाणी मिळत आहे. हंडा मोर्चाच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाची ऑडिओ क्लिप सर्वसमोर ऐकवत, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पाणी आंदोलन जाहीर केले आहे.

शहरातील नागरिक पाण्याविना त्रस्त आहे. सरकार आणि मनपा प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. आम्ही या गंभीर समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणार असल्याचे सांगत दानवे यांनी आंदोलनाचे महिनाभराचे टप्पे जाहीर केले आहेत.

आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात शहरातील प्रमुख प्रवेशद्वारांवर आणि महत्वाच्या ठिकाणी रिकाम्या हंड्यांचे तोरण लावून सरकारचे लक्ष वेधणार असून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांमध्ये तीन दिवस ‘कट्टा बैठका’ आयोजित केल्या जाणार आहे.

नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांची मोहीम व्यापक स्तरावर राबवून २५ एप्रिल रोजी महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर केले जाणार आहे. २६ एप्रिल रोजी शहरात सायकल रॅली काढण्यात येणार आहे. शहरातील ६४ पाण्याच्या टाक्यांवर महिला आघाडीच्या पदाधिकारी हळद कुंकू लावून पूजनाचे प्रतीकात्मक आंदोलन करणार आहे. देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि महानगरपालिका आयुक्तांना एक लाख ईमेल पाठवून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधणार असल्याचे सांगण्यात आले.

संघटनात्मक बांधणीसाठी पाणी आंदोलन

गेल्या काही महिन्यापासून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. पराभूत उमेदवारांसह अनेक जणांनी पक्ष सोडल्यामुळे संघटनात्मक वीण विस्कटली होती. याच काळात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे याच्यातील वादही चव्हाट्यावर आले होते. यातून मार्ग काढण्यासाठी पाणी आंदोलन हाती घेतल्याचे मानले जात आहे.