मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बुगूल वाजताच दक्षिण मुंबईमधील मलबार हिल मतदारसंघ आपल्या पक्षाला मिळावा यासाठी महाविकास आघाडीमधील शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अहमहमीका लागली आहे. भाजपने पुन्हा एकदा विद्यमान आमदार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांना उमेदवारी जाहीर करताच शिवसेनेने (उद्धव ठाकरे) अमराठी उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. त्याच वेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मराठी मतदारांची निर्णायक मते पदरी पाडून घेण्यासाठी मराठी उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. मलबार हिल मतदारसंघ आपल्या पक्षाच्या हिश्श्याला यावा यासाठी उभय पक्षांचे कार्यकर्ते व्यूहरचना करण्यात दंग आहेत.
विदर्भाप्रमाणेच दक्षिण मुंबईमधील सहा विधानसभा मतदारसंघांवरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेसमध्ये वाद शिगेला पोहोचण्याची चिन्हे आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, वरळी, भायखळा आणि शिवडी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. विधानसभेच्या मागील निवडणुकीमध्ये कुलाबा मतदारसंघातून भाजपचे राहुल नार्वेकर, मुंबादेवीतून काँग्रेसचे अमिन पटेल, मलबार हिलमधून भाजपचे मंगलप्रभात लोढा, वरळीतून शिवसेनेचे आदित्य ठाकरे, भायखळ्यातून यामिनी जाधव, शिवडीतून अजय चौधरी निवडून आले होते. शिवसेनेची शकले झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना अखेरचा दंडवत घालत यामिनी जाधव शिवसेनेत (एकनाथ शिंदे) दाखल झाल्या. आता कुलाबा, मुंबादेवी आणि मलबार हिल मतदारसंघ काँग्रेसला मिळावेत, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे.
हेही वाचा >>>नाराज, इच्छुकांची ‘सागर’वर भाऊगर्दी; पहिल्या यादीत नाव नसल्याने चिंता व्यक्त, बंडखोरी न करण्याचे फडणवीस यांचे आवाहन
एकेकाळी मलबार हिल विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. विधानसभेच्या १९९५ मधील निवडणुकीत भाजपने मंगलप्रभात लोढा यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि त्यांनी काँग्रेसचे मातब्बर नेते बी. ए. देसाई यांचा पराभव केला. त्यानंतर सलग सहा निवडणुकांमध्ये विजयश्री मिळवून मंगलप्रभात लोढा विधानसभेत गेले. भाजपने पुन्हा एकदा मंगलप्रभात लोढा यांना मलबार हिलमधून उमेदवारी जाहीर केली आहे. लोढा यांचा पराभव करण्यासाठी शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे.
एकेकाळी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मराठी भाषक मतदार होते. मात्र निरनिराळ्या कारणांमुळे मराठी भाषक मतपेढीतील मतदारांची संख्या कमी होत गेली आणि अमराठी मतदारांची संख्या वाढली. तथापि आजही मराठी मतदारांची मते निर्णायक ठरत आहेत. ही बाब लक्षात घेऊन काँग्रेस कार्यकर्ते डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. विधानसभेच्या मागीत निवडणुकीत हिरा देवासी यांना मलबार हिलमधून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र लोढा यांच्या पुढे त्यांचा टिकाव लागला नाही. त्यामुळे देवासी यांना कुलाब्यातून उमेदवारी द्यावी आणि मलबार हिलमधील मराठी मतांचा टक्का लक्षात घेऊन मराठी उमेदवार द्यावा, असा आग्रह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धरला आहे. त्याच वेळी लोढा यांचा पराभाव करण्यासाठी शिवसेनेने (उद्धव ठाकरे) सॉलिसिटर भैरू चौधरी (जैन) यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्याची तयारी करीत आहेत. मतदारसंघातील शिवसैनिक त्यादृष्टीने कामालाही लागले आहेत. लोढा यांच्या अमराठी मतपेढीचे विभाजन आणि हक्काची मराठी मते मिळाल्यानंतर भैरू चौधरी (जैन) यांचा विजय होईल असे शिवसैनिकांचे गणित आहे. त्यामुळे मलबार हिल मतदारसंघ शिवसेनेला (उद्धव ठाकरे) मिळावा यासाठी शिवसैनिक आग्रही आहेत. महाविकास आघाडीमध्ये मलबार हिलवरून रस्सीखेच सुरू असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी फौज लोढा यांच्या प्रचारासाठी सज्ज झाली आहे.