राजापूर : रत्नागिरी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे पाठिंबा जाहीर केल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील शिवसेनेमध्ये फूट अटळ असल्याचे दिसून येत आहे.
कोकणातील एकमेव कॅबिनेट मंत्री सामंत यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत बहुसंख्य शिवसैनिकांनी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून सामंत यांच्यासमवेत शिवसेनेत आलेले कार्यकर्ते त्यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. या कार्यकर्त्यांसह तालुक्यातील युवासेनेच्याही काही पदाधिकाऱ्यांनी जिथे आमचे साहेब, तिथे आम्हीह्ण अशी भूमिका जाहीर केली. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील शिवसेनेत फूट अटळ झाली आहे.
शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंडय़ा साळवी, विधानसभा क्षेत्र संघटक व ज्येष्ठ शिवसैनिक प्रमोद शेरे इत्यादी पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतच राहण्याचा निर्धार व्यक्त केला.