चारुशिला कुलकर्णी, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यातील बेबनावानंतर नाशिकमध्ये गळती थांबविण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना साकडे घातले आहे. त्यानुसार भव्य स्वरूपात महिला मेळावा घेण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र मेळाव्यास रश्मी ठाकरे उपस्थितीत राहतील किंवा नाही, याविषयी अनिश्चितता आहे.

आदेश शिरसावंद्य मानत पक्षप्रमुख सांगतील ती पूर्व दिशा ही निष्ठा बाळगत वाटचाल करणारी शिवसेना गेल्या काही दिवसांमध्ये खिळखिळी झाली. अंतर्गत वादांमुळे शिवसेनेत फाटाफूट झाली. सत्तेचा फायदा घेत राज्यात ठिकठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपला गट वाढविण्यासाठी प्रयत्नरत असतांना ठाकरे गटाला गळतीचे ग्रहण लागले. राज्यात गळती सत्र सुरू असतांना नाशिक मात्र काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटासाठी अभेद्य राहिले होते. नाशिकची जबाबदारी संपर्क नेते खा. संजय राऊत यांच्यावर होती. पडझडीतही नाशिकचे शिवसैनिक आमच्याकडे असल्याचा दावा खासदार राऊत करीत असत. काही दिवसांनी त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला. खासदार हेमंत गोडसे, नाशिक महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासारखे मोहरे शिंदे गटाला जाऊन मिळाले. त्यानंतर राऊत हे नाशिक दौऱ्यावर असले की शिंदे गटाकडून ठाकरे गटातील माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा पक्ष प्रवेश सोहळा करायचा, हे ठरुनच गेले होते. पक्षांतराचा हा खेळ रंगलेला असतांना उध्दव ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी मालेगाव येथे जाहीर सभा असतांना नाशिकमधील ठाकरे गटाच्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आपणास विश्वासात घेतले जात नाही, वैयक्तिक टिप्पणी केली जाते, अशी कारणे पुढे करीत शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये शिवसेनेच्या स्वीकृत माजी नगरसेवक ॲड. श्यामला दीक्षित, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शोभा गटकळ, शोभा मगर, अनिता पाटील आदींचा समावेश आहे. भक्कम असलेली महिला आघाडीही फुटल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा हादरा ठरला.

आणखी वाचा- कर्नाटकमध्ये भाजपाला मोठा धक्का, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

ठराविक दिवसांनी काही कार्यकर्ते, पदाधिकारी पक्ष सोडू लागल्याने ठाकरे गट दिवसागणिक कमकुवत होऊ लागला. पक्षाला बळकटी देण्यासाठी, गळती सत्र राेखण्यासाठी ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना पदाधिकाऱ्यांनी साकडे घातले आहे. रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत एप्रिल महिन्याच्या अखेर नाशिकमध्ये महिला मेळावा घेण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याआधी रश्मी यांनी मुंबईत अनेक ठिकाणी कार्यक्रमांना हजेरी लावली आहे, मोर्चामध्ये सहभाग घेतला होता. मालेगाव येथे झालेल्या सभेसही रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. रश्मी ठाकरे यांचे उध्दव यांच्यासोबत ठिकठिकाणच्या सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहण्यातून त्या सक्रिय राजकारणात प्रवेश करतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

नाशिक येथे होणाऱ्या महिला मेळाव्याच्या अनुषंगाने नियोजनाने वेग घेतला आहे. विभागनिहाय महिला आघाडी सह अन्य पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. महिलांना मेळाव्यापर्यंत पोहचता यावे यासाठी वाहतूक व्यवस्था, महिलांची काही गैरसोय होऊ नये यासाठी काय करता येईल, अशा वेगवेगळ्या विषयांवर काम सुरू असतांना ज्यांच्यासाठी ही खटाटोप सुरू आहे, त्या रश्मी ठाकरे मेळाव्यास उपस्थितीत राहणार का, याविषयी पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. अनिश्चिततेच्या सावटाखाली कार्यकर्त्यांची धावपळ मात्र पाहण्यासारखी आहे.

आणखी वाचा- कर्नाटकमध्ये निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षविस्तार

रश्मीताई यांनी मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी अद्याप तारीख दिलेली नाही. एप्रिलअखेर हा मेळावा होईल. यासाठी सर्वांना मध्यवर्ती ठरणारे दादासाहेब गायकवाड सभागृह येथे मेळावा घेण्यात येईल. रश्मीताईंची तारीख मिळाली की मेळाव्याचे नियोजन सुरू होईल. सध्या विभागनिहाय बैठका सुरू आहेत. -सुधाकर बडगुजर (महानगरप्रमुख, शिवसेना ठाकरे गट)

मेळाव्यासाठी तारीख मिळालेली नाही. त्यामुळे मेळावा होईल की नाही हे सांगता येत नाही. मात्र त्या अनुषंगाने बैठका सुरू आहेत -दत्ता गायकवाड (ठाकरे गटाचे पदाधिकारी)

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena womens meeting in nashik rashmi thackeray invited print politics news mrj