दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सत्ता मिळवली असली तरी निकालावरून कोल्हापूर काँग्रेसच्या आजी-माजी जिल्हाध्यक्षांच्या समर्थकांमध्ये समाज माध्यमातून शाब्दिक वाद झडत आहे. निवडणुकीत नरके यांची नौका पैलतीराला लागली पण आमदार सतेज पाटील – आमदार पी. एन. पाटील यांच्या समर्थकांतील अंतर वाढले आहे.

कुंभी कारखान्याची निवडणूक यावेळी अतिशय चुरशीने झाली. शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या सत्तेला कॉंग्रेसबहुल विरोधकांनी आव्हान दिले होते. विरोधकांचे नेतृत्व नरके यांचे राजकीय प्रतिस्पर्धी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांच्याकडे होते. त्यांना जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके, त्यांचे पुत्र चेतन नरके यांची साथ होती. तरीही चंद्रदीप नरके यांनी एक हाती किल्ला लढवत विजयाचा चौकार लगावला. निकाल लागल्यानंतर आठवड्याभरातच चंद्रदीप नरके यांनी ठाकरे की शिंदे ही तळ्यात मळ्यातील भूमिका सोडून देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत शिंदे गोटात जाणे पसंत केले.

नरकेंमुळे कॉंग्रेसमध्ये मतभेद

चंद्रदीप नरके यांची राजकीय वाटचाल व्हायची ती होईल. विधानसभा निवडणुकीत व्हायचा तो परिणाम होईल. पण त्याआधी कुंभी कासारी कारखान्याच्या निवडणूक निकालावरून काँग्रेसच्या दोन गटांमध्ये जुंपली आहे. नरके यांना निवडणुकीत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची मदत निर्णायक ठरली. किंबहुना त्यांच्याशिवाय नरके यांचा विजय सुकर नव्हता. साहजिकच निकालानंतर चंद्रदीप नरके – सतेज पाटील यांच्या समर्थकांनी दोघांच्या एकत्रित प्रतिमा असलेले संदेश समाज माध्यमांमध्ये अग्रेषित केले. हाच मुद्दा पी. एन. पाटील गटाच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना झोंबला. त्यांनी शिवसेनेचे नरके यांच्या विजयाचा उदोउदो, गवगवा काँग्रेस पक्षाच्या समाज माध्यमाच्या समूहावर उपस्थित करण्याची गरजच काय, असा प्रश्न केला. नरके यांच्या विरोधात काँग्रेसचे संचालक निवडणूक लढवत असताना त्यांनी सतेज पाटील यांनी पाठबळ देणे गरजेचे होते; मात्र नरके यांची पाठराखण केल्याचा मुद्दा उपस्थित करून पी. एन. पाटील समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तथापि, या मुद्द्याशी सतेज पाटील समर्थक अजिबात सहमत झाले नाहीत. कुंभीची निवडणूक सहकार पातळीवर होती. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत चंद्रदीप नरके यांनी मदत केली असल्याने त्याची परतफेड कुंभीच्या निवडणुकीत केली गेली, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे. इतक्यावर न थांबता त्यांनी गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांना भाजपच्या महाडिक परिवारांनी आव्हान दिले असताना त्यांना करण्याऐवजी पी. एन. पाटील यांनी महाडिक यांना मदत कशी केली होती याचे स्मरण करून दिले. त्यावेळी त्यांना काँग्रेस पक्षाची आठवण का झाली नाही, असा बोचरा सवाल सतेज पाटील समर्थकांनी केला आहे. उलट सुलट मतमतांतरे व्यक्त होत राहिली. यामुळे नाही म्हटले तरी या निवडणुकीच्या निमित्ताने सतेज पाटील – पी. एन. पाटील यांच्या समर्थकांमध्ये अंतर निर्माण झाले आहे.

राजाराम कारखान्यावर परिणाम

एका घटनेचे परिणाम दुसरीकडे हे राजकारणाचे अविभाज्य अंग मानले जाते. स्वाभाविकच कुंभीच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी चंद्रदीप नरके यांना मदत केली. आता राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नरके हे सतेज पाटील यांच्यासोबत राहतील असे उघड बोलले जात आहे. गोकुळ, जिल्हा बँक अशा महत्त्वाच्या सहकारी संस्था वरील प्रभुत्व दुरावल्याने महाडिक कुटुंबांच्या हाती केवळ राजाराम कारखाना राहिला आहे. कुंभीतील पराभवाची प्रतिक्रिया म्हणून पी. एन. पाटील यांचे समर्थक महाडिक यांच्या बाजूने जातील असे त्यांच्या भूमिकेवरून दिसत आहे. याचाच अर्थ कुंभी कासारी निवडणुकीच्या यश – अपयशाचे परिणाम राजाराम कारखान्यावर उमटणार याची चुणूक दिसत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena won the kumbhi kasari sahakari sakhar karkhana election but the two congress started arguing print politics news asj
Show comments