नंदुरबार : शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेसाठी दिलेली उमेदवारी म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या वचनाची पूर्ती असून रघुवंशी यांच्या माध्यमातून विधान परिषदेची शिवसेनेची ही जागा नंदुरबारकडेच कायम राहिली आहे. धुळे- नंदुरबार जिल्हा परिषदेचे दोनदा अध्यक्ष आणि तीन वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिलेल्या रघुंवशी यांना दिलेल्या या संधीमुळे नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच एकाचवेळी शिवसेनेचे दोन आमदार दिसणार आहेत. एकसंघ शिवसेनेकडून आमश्या पाडवी विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे) कोणाला संधी मिळणार याबाबत अंदाज बांधले जात होते.

नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांची घोषणा झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काँग्रेसमध्ये विधान परिषद सदस्य असताना आणि कालावधी शिल्लक राहूनही आमदारकीचा राजीनामा देत रघुवंशी यांनी एकसंघ शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी दोन वेळा राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये रघुवंशी यांच्या नावाची शिफारस झाली. मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या नियुक्त्याच रखडवल्याने रघुवंशी समर्थकांचा हिरमोड झाला होता.

शिवसेना दुभंगल्यानंतर आमश्या पाडवी यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमश्या पाडवी हे निवडून आले. निवडणूक प्रचारात धडगावमध्ये आयोजित सभेत आमश्या पाडवी यांना निवडून द्या . मी चंद्रकांत रघुवंशी यांना विधानपरिषदेवर पाठवतो, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले होते. रघवुंशी आणि भाजपचे डॉ. विजयकुमार गावित यांच्यातील वादातून पाडवी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांमध्ये महायुती विरोधात काम केल्याचा आरोप करत रघुवंशी विरोधकांनी पक्षश्रेष्ठीकडे तक्रारी आणि अहवालही दिले होते .त्यामुळेच रघुवंशी यांची संधी हुकणार,अशा अफवा पसरल्या होत्या.

परंतु,रघुवंशी यांना ताकद दिल्यास उत्तर महाराष्ट्रात खास करुन धुळे, नंदुरबारमध्ये शिवसेनेची धार अधिक वाढेल, या विचारातून आणि दिलेल्या शब्दाची पूर्ती करण्यासाठी शिंदे यांनी रघुवंशी यांना विधानपरिषदेसाठी संधी दिली. आगामी काळातील जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांमध्ये रघुवंशी यांची असलेली जिल्ह्यावरील पकड लक्षात घेवून शिवसेनेने केलेली ही खेळी मात्र मित्रपक्ष भाजपला कितपत रुचेल, याबाबत साशंकता आहे.

रघुवंशी यांना याआधी काँग्रेस पक्षाकडून एक जानेवारी १९९८ ते ३१ डिसेंबर २००३ या कालवधीसाठी पहिल्यांदा विधान परिषदेवर संधी मिळाली होती. दुसऱ्यांदा एक जानेवारी २००४ ते १ जानेवारी २०१० या कालवधीमध्ये ते विधानपरिषेदवर गेले. तर २४ एप्रिल २०१४ ते २ ऑक्टोंबर २०१९ या कालावधी साठी त्यांना तिसर्यांदा काँग्रेसकडून विधान परिषदेवर संधी मिळाली होती. नंदुरबार जिल्ह्यातील चारही जागा या आदिवासी राखीव असल्याने निवडणूक न लढवू शकलेल्या रघुवंशी यांच्यासाठी विधानपरिषद हा एकमेव मार्ग असल्याने या माध्यामातून त्यांनी नंदुरबार नगपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा बँक अशा विविध संस्थावर दबदबा कायम ठेवला आहे. त्यामुळे आता त्यांची लागलेली विधान परिषदेवरील वर्णी विरोधकांसाठी डोकेदुखी ठरणारी असून शिवसेना आणि त्यांच्या समर्थकांना बळ देणारी आहे.

Story img Loader