सांगली : राज्यात महायुतीची सत्ता असल्याने सत्तेच्या वळचणीला आश्रयासाठी जाणार्याची संख्या काही कमी नाही. जिल्ह्यात शिवसेना ठाकरे पक्षाची ताकद अगदी तोळामासाच. पक्षात पदाधिकारी वगळता कार्यकर्त्यांची संख्या दोन्ही हाताची बोटेही जास्त भरावीत अशी. आणि जे निष्ठावान म्हणवून घेणारे ध्येय धोरणाशी कितपत आणि कधी पर्यंत प्रामाणिक राहतील याचा भरवसाच उरलेला नाही. आताही आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवत शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाची अवस्था मात्र, ‘चारशे खिडक्या, आठशे दारे कुणा वाटेने गेली सेना’ अशीच झाली आहे.
मूळ शिवसेना जिल्ह्यात रूजलीच नाही याला कारण आहे ते स्थानिक पातळीवर पक्षाने दिलेले नेतृत्वच असेच म्हणावे लागेल. निवडणुका आल्या की पक्षात भाउगर्दी वाढते. निवडणुका ओसरल्या की महापूराच्या पाण्याप्रमाणे गर्दीही ओसरते. जिल्ह्यात आठ विधानसभेच्या जागा. यापैकी खानापूर मतदार संघात शिवसेनेचे अस्तित्व दिसून आले ते स्व. अनिल बाबर यांच्यामुळेच. त्यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा होता. विधानसभा निवडणुकीवेळी मात्र , युतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. यामुळे त्यांनी शिवबंधन हाती बांधले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी सुरत गाठली त्यावेळी त्यांच्यासोबत बाबर यांनीच पहिली साथ दिली. त्यांच्या पश्चात बाबर गट शिवसेना शिंदे गटात सहभागी झाला आणि विधानसभा निवडणुकीत ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून सुहास बाबर यांनी जिंकली.
याच तालुक्यातील संजय विभुते यांच्याकडे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी होती. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली लोकसभेची जागा शिवसेनेने हट्टाने घेतली. मात्र, याचा फारसा परिणाम मतदानावर झाल्याचे आढळले नाही. डबल महामराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा दारूण पराभव झाला. मात्र, अपक्ष निवडणुकीत उतरलेले विशाल पाटील हे खासदार झाले. भाजप विरोधात झालेले मतदान महाविकास आघाडीचेच आहे असे समजून विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी शिवसेनेत गर्दी झाली. निवडणुकीचे निकाल लागताच महाविकास आघाडीच्या ताकदीचा जसा फुगा फुटला तशी शिवसेना ठाकरे गटाची जिल्ह्यातील ताकद पोकळ असल्याचे स्पष्ट झाले.
आता विभुते यांच्यासह युवा जिल्हा प्रमुख ऋषिकेश पाटील, सिध्दार्थ जाधव यांच्यासह उपजिल्हा प्रमुख गौरीशंकर भोसले खानापूर, निळू देशपांडे आटपाडी, विरू फाळके आदी कार्यकर्त्यांनी ठाकरे गटातून बाहेर पडत शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेशही केला. मूळ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख इस्लामपूरचे आनंद पवार यांनी पक्ष फुटला तेव्हाच शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय झाला. तर दुसरे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख चिकुर्डेचे अभिजित पाटील आपले गाव आणि मंडळातील काही गावातच बस्तान मांडून आहेत. त्यांचा जिल्हाभर फारसा वावरही नाही, आणि संधीही दिसत नाही. यामुळे ठाकरे गटाची अवस्था आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत बिकट होणार असे दिसते.
मुळात कार्यकर्ता टिकून राहण्यासाठी त्याच्या अडीअडचणीला पाठीशी राहणारे आणि ताकद देणारे नेतृत्व हवे असते. तसे ठाकरे शिवसेना नेत्वृवाकडून फारसे दिसत नाही. यामुळेच कार्यकर्ते सैरभर झाले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे हे शिवसेनेच्या कार्यकर्त्याना आश्वासक नेतृत्व वाटत असेल तर यामध्ये कार्यकर्त्यांची मानसिकता चुकीची म्हणता येणार नाही. ठाकरे गटाचे ज्या पध्दतीने मुंबई आणि कोकणावर लक्ष असते तसे सांगली जिल्ह्यात लक्ष दिसत नाही. यामुळे कार्यकर्ते आपल्या ताकदीवरच पक्ष संघटना वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. तरीही किती काळ असेच चालत राहायचे असा प्रश्न सामान्यांना पडणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती जर एकसंघपणे निवडणुकीला सामोरी गेली तर काही जागा तरी पदरात पडतील. अन्यथा केवळ आंदोलने, मोर्चे करत रस्त्यावरची लढाई किती दिवस करायची हा कार्यकर्त्यांचा सवाल वावगा म्हणता येणार नाही.