संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहाचे कामकाज आता नव्या संसदीय इमारतीत हलविण्यात आले आहे. त्यानंतर अनेक नेते जुन्या संसदेशी निगडित आठवणींना उजाळा देत आहेत. बिहारच्या भोजपूरमधील ७९ वर्षीय समाजवादी नेते शिवानंद तिवारी यांनीही आपल्या आठवणी सांगितल्या. तिवारी जनता दल (युनायटेड) पक्षातर्फे २००८ ते २०१४ या काळात राज्यसभेचे प्रतिनिधित्व करत होते. जुन्या संसदेशी निगडित आठवणी आणि भावनिक बंध कसे होते, हे त्यांनी उलगडून सांगितले. तिवारी सध्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचे (RJD) राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. द इंडियन एक्सप्रेसने शिवानंद तिवारी यांच्या आठवणींबाबत लेख प्रकाशित केला आहे.
तिवारी म्हणाले, “आम्ही (खासदार) सेंट्रल हॉलमध्ये नेहमी एकत्र बसायचो. तिथे मंत्रीही येऊन भेटायचे. आता मात्र तसे होत नाही. माझ्या कार्यकाळाची समाप्ती होत असताना मी संसदेत अतिशय गोंधळाची परिस्थिती पाहिली. २ जी स्पेक्ट्रम वितरणाचा भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचा (CAG) अहवाल प्राप्त झाला होता. वर्तमानपत्रांनी अहवालावरून बातमी करत असताना त्यामध्ये १.८ लाख कोटींचा घोटाळा झाल्याचे म्हटले, आमच्यासाठी हे धक्कादायक होते. मी त्यावेळी जनता दल (युनायटेड) पक्षाचे प्रतिनिधित्व करत होतो. त्या दिवशी मी सकाळीच संसदेत पोहोचलो. मी सभागृहात जिथे बसत होतो, त्याच्या शेजारीच एका बाजूला सीताराम येचुरी (सीपीआय-एमचे नेते) आणि दुसऱ्या बाजूला मायावती (बसपा) बसत होत्या. मी वर्तमानपत्र बाहेर काढून त्यावर चर्चा करू लागलो.”
“मी वर्तमानपत्र दाखवत असताना इतर नेतेही माझ्या शेजारी येऊन या विषयावर बोलू लागले. तेवढ्यात मला दिसले की, राज्यसभेत उपस्थित असलेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग माझ्या दिशेने चालत येत आहेत. पंतप्रधान माझ्यासमोर उभे राहिल्यानंतर मला थक्क व्हायला झाले. त्यानंतर ते नम्रपणे म्हणाले की, आम्ही एक समिती स्थापन केली असून ती यावर चर्चा करणार आहे. त्यामुळे आम्ही याबाबत फार गोंधळ घालू नये. त्यानंतर माझ्यासह उपस्थित असलेले खासदार म्हणाले, तुम्ही हे सभागृहाच्या पटलावर मांडा, त्यानंतर आम्ही शांत बसतो”, अशी आठवण तिवारी यांनी सांगितली.
तिवारी पुढे म्हणाले की, जेव्हा राज्यसभेचे कामकाज सुरू झाले, तेव्हा विरोधकांनी या विषयावरून काँग्रेसप्रणीत युपीए आघाडीच्या सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. तसेच सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी केली. त्यावेळी मात्र पंतप्रधान मनमोहन सिंग काहीच बोलले नाहीत. “विरोधक सरकारची कोंडी करत असताना पंतप्रधान असहाय्यपणे बसलेले पाहणे आमच्यासाठी हृदयद्रावक होते. त्याचदरम्यान राष्ट्रकुल स्पर्धेतील गैरव्यवहार बाहेर आला आणि पुन्हा एकदा सरकारला भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरले. या सगळ्याचा परिणामस्वरूप नरेंद्र मोदी यांचा उदय झाला”, असे निरीक्षण शिवानंद तिवारी यांनी नोंदविले.
आणखी वाचा >> उत्साह, गोंधळ, सेल्फी घेण्याचा मोह; नव्या संसद भवनात खासदारांचा पहिला दिवस कसा होता?
तिवारी यांना राज्यसभेवर पुन्हा नामनिर्देशित न केल्यामुळे त्यांनी जेडीयू पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर नितीश कुमार यांनी त्यांना २०१४ ची लोकसभा निवडणूक लढविण्यास सांगितले होते. मात्र, तिवारी यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आणि त्यानंतर राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला.
तिवारी यांच्या मते ते जेव्हा खासदार होते, तेव्हा संसदेत कामकाजाचा एक दर्जा पाळला जात होता. “त्यावेळी संसदेचे गांभीर्य राखले जात होते. सभागृहात होणाऱ्या चर्चेचा दर्जा राखला जात होता. सदस्यांना चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात होता आणि अध्यक्षस्थानी किंवा सभापतीच्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती सदस्यांची प्रतिष्ठा राखली जाईल, याचा प्रयत्न करत होती”, अशा शब्दात विद्यमान संसदेच्या कामकाजाबाबत तिवारी यांनी खंत व्यक्त केली.