सतीश कामत

चिपळूणएकेकाळी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार चालणाऱ्या शिवसेनेमध्येही गटबाजी सेनेचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात वेगाने वाढू लागली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याचा थेट लाभ होण्याची चिन्हे दिसत आहेत. ही गटबाजी इतक्या टोकाला गेली आहे की जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना या पदावरून हटवण्याची मागणी जिल्ह्यातील शिवसैनिकांकडूनच आली आहे  आणि ते कमी होते म्हणून की काय, जिल्ह्यातील शिवसेनेचे वजनदार मंत्री उदय सामंत यांच्या राजीनाम्याचीही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

काय घडले-बिघडले?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने राज्यभरात ‘शिवसंपर्क अभियान’ जाहीर केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ही मोहीम यशस्वी करण्याच्या नियोजनासाठी चिपळूण येथे बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. पण या बैठकीत अभियानाची चर्चा बाजूलाच राहिली आणि पक्षकार्यकर्त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेत त्यांची येथून ‘बदली’ करण्याची मागणी लावून धरली. याचबरोबर, चिपळूण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांच्या विजयामध्ये आपलाही सहभाग असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नुकतेच एका कार्यक्रमात जाहीरपणे सांगितले. म्हणून पक्षाशी गद्दारी केल्याबद्दल त्यांच्या हकालपट्टीचीही मागणी बैठकीत करण्यात आली. पक्षाच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात २६ मे २९ मे या कालावधीत ‘शिवसंपर्क अभियान’ राबवले जाणार आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख शरद बोरकर आणि जिल्हा संपर्कप्रमुख सुनील मोरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची खास बैठक झाली. मागील विधानसभा निवडणुकीत चिपळूण मतदारसंघातून पराभूत झालेले शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण, उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख सचिन कदम यांच्यासह खेड, दापोली, मंडणगड गुहागर तालुक्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी थेट पालकमंत्री परब यांच्यावर तोफ डागली. विभाग प्रमुख, गटप्रमुख, शाखाप्रमुख यांनी काय काम केले याविषयी पक्षाकडून नेहमी अहवाल मागवला जातो. त्याच धर्तीवर गेल्या अडीच वर्षांत परब यांनी पालकमंत्री म्हणून काय काम केले, याचा प्रथम खुलासा करावा, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. पालकमंत्री जिल्ह्यात फिरकत नाहीत, कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कामे होतात, मात्र शिवसैनिकांची कामे होत नाहीत. चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम पालकमंत्री करीत आहेत. दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत पालकमंत्री आले आणि दोन गटात वाद लावून निघून गेले त्यानंतर पालकमंत्री राष्ट्रीय कार्यक्रम वगळता जिल्ह्यात कधी फिरकत नाहीत असे एकामागोमाग एक गंभीर आरोप करत असा पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याला नको, अशी एकमुखी मागणी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. चिपळूण तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रथम ही मागणी केल्यानंतर उर्वरित तालुक्यातून पालकमंत्री बदलाच्या मागणीला जोर आला. खेड दापोली मंडणगड तालुक्यातील महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही पालकमंत्र्यांविषयी नाराजी व्यक्त करत त्यांना बदलण्याची मागणी केली.

संभाव्य राजकीय परिणाम

एकीकडे पालकमंत्री अनिल परब यांना बदलण्याची मागणी होत असताना दुसरीकडे, शेजारच्या दापोली तालुक्यात शिव संपर्क अभियान राबवण्याची जबाबदारी आमदार योगेश कदम यांच्यावर सोपवण्यात आली असल्याची घोषणा शरद बोरकर यांनी केल्यानंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कारण याही तालुक्यातील शिवसेना गटबाजीने पोखरलेली आहे. माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि आमदार योगेश कदम यांचे गट आहेत. दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीची सूत्रे दळवी यांच्याकडे देण्यात आली होती. त्यामुळे शिव संपर्क अभियान नक्की कोण राबवणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. या पार्श्वभूमीवर नेतृत्वाकडून योगेश कदम यांच्यावर अभियानाची जबाबदारी सोपवल्यामुळे हा पक्षांतर्गत संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे असून शिवसेनेतील ही गटबाजी राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत. 

Story img Loader