लातूर : सात वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळणारे नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष, गृहमंत्री पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज पाटील हे कॉग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या किचन कॅबिनेटमधील व्यक्ती, अशी त्यांची ओळख. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या स्नुषा अर्चना पाटील चाकुरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणूक लढविली. पराभूत झाल्या. ‘ परिवारात’ सहभागी करुन घेताना बरीच खळखळ झाल्यानंतर अर्चनाताईंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिला. त्यांच्यासह कॉग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकुरकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुटुंबीयांसह भेट घेतली आणि लातूरमध्ये प्रतिक्रिया उमटली ‘ ‘देवघरा’तील देवही आता या घरातून त्या घरात गेले.
लातूरमध्ये शिवराज पाटील चाकुरकर यांच्या घराचे नाव ‘देवघर ’. अर्चना चाकुरकर विधानसभा निवडणुकीमध्ये उभ्या होत्या तेव्हा कॉग्रेसचे उमेदवार अमित देशमुख टीका करत हाेते, ‘देव्हाऱ्यातील देवही भाजपवाल्यांनी चोरला, देव आमच्या सोबत आहे अशी टिप्पणी केली होती.’
लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुधाकर शृंगारे यांचा पराभव झाला व काँग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे विजयी झाले. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने शिवराज पाटील चाकूरकर यांचे छायाचित्र वापरले होते. लोकसभा निवडणुकीनंतर लातूर येथे झालेल्या मराठवाड्यातील तीन खासदारांच्या सत्कार समारंभात बोलताना अर्चना चाकुरकर यांनीही काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांना सुनावले हाेते, ‘देव ’नेमका कोणाच्या बाजूने आहे हे आपल्याला कळेलच’ असे त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळेच कौटुंबिक भेट लातूरच्या पटलावर राजकीय झाली. अर्चना पाटील चाकूरकर यांचे पती शैलेश पाटील यांनीही आपण काँग्रेसमध्येच असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
दिल्ली येथे पंतप्रधानाच्या निवासस्थानी शिवराज पाटील चाकूरकर हे आपल्या दोन नाती एक जावई, सुनबाई यांच्या समवेत भेटायला गेले. त्यांच्या भेटीमध्ये लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना,नवीन संसद भवन, महिलांचे सशक्तीकरण अशा अनेक विषयावरती चर्चा झाली सुमारे ५० मिनिटे चाकुरकर परिवार नरेंद्र मोदी यांच्या समवेत होता. चाकूरकरांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन भेटल्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. वयाच्या ९० मध्ये शिवराज पाटील यांनी घेतलेल्या भेटीमुळे राजकीय पटलावर पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याचा सूर देवघरातील देवांसह भाजपशी जवळीक का ?