जालना – सलग पाच वेळेस निवडून आलेले राजेश टोपे (राष्ट्रवादी-शरद पवार) यांच्याविरुद्ध घनसावंगी विधानसभा मतदारसंघात दोन वेळा पराभूत झालेल्या हिकमत उडाण यांना पक्षात घेऊन नवे रिंगण आखले आहे.

टोपे यांच्याविरुद्ध मागील दोन्ही निवडणुकीत पराभूत झालेले फुटीपूर्वीच्या शिवसेनेतील हिकमत उडाण यांची महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे मोठी पंचाईत झाली. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ टोपेंकडे जाणार असल्याने त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. महायुतीत हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाईल हे गृहित धरून त्यांनी पक्षांतर केले. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी आलेल्या मुखयमंत्र्यांनी मात्र प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे निश्चित असलेले उमेदवार राजेश टोपे यांचा नामोल्लेखही आपल्या भाषणात केला नाही आणि त्यांच्यावर टीकाही केली नाही. मात्र, उडाण यांच्या पक्षप्रवेशाला आलेले एवढे कार्यकर्ते प्रचारात उतरले तर समोरच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा – हितेंद्र ठाकूरांचा कल महाविकास आघाडीकडे ?

हिकमत उडाण मूळ घनसावंगी तालुक्यातील असून काही वर्षे उपजिल्हाधिकारी म्हणून काम केल्यावर त्यांची मंत्रालयात बदली झाली आणि ते शिवसेना नेत्याच्या संपर्कात आले. नोकरी सोडल्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेकडून टोपेंच्या विरुद्ध निवडणूक लढविली. परंतु त्यांचा निभाव लागला नाही. घनसावंगी भागात राजकारण करायचे ठरल्यावर त्यांनी यापरिसरात उसापासून गुलाची भुकटी तयार करणारा उद्योग उभा केला. यावेळेस तिसऱ्यांदा ते टोपे यांच्याविरुद्ध उभे राहात आहेत.

हेही वाचा – महायुती सरकारवर टीका करीत राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण बंडाच्या पवित्र्यात

ऐनवेळी शिवसेनेच्या शिंदे गटात उडाण यांच्या प्रवेशामुळे या पक्षातील जुने म्हणजे १९८९ पासून कार्यरत असलेले पंडित भुतेकर यांची अडचण झाली. त्यांच्या पूर्वतयारीस पक्षात अर्थ उरला नाही आणि आता नेमकी काय भूमिका घ्यावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. या भागातील एक खासगी साखर कारखाना चालक सतीश घाडगे हेही भाजपकडून टोपेविरुद्ध उभे राहण्यास इच्छुक आहेत. आपल्याला उमेदवारी मिळणे कसे आवश्यक आहे हे त्यांनी भाजप कार्यालयाच्या मेळाव्यात सांगितले. तर भाजपचे जुने पदाधिकारी सुनील आर्दड यांनीही उमेदवारीवर स्वत:चा हक्क सांगताना घाडगे हे बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याचा उल्लेख केला. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी घेतलेल्या अनेक बैठकांत त्यांना अपक्ष निवडणूक लढविण्याचा आग्रह झाला. सेवानिवृत्त विभागीय आयुक्त मधुकर आर्दड हेही टोपेंच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. तर आणखी एक सेवानिवृत्त शासकीय अधिकारी दिनकर जायभाये यांच्या उमेदवारीची आणि पूर्वतयारीची चर्चा घनसावंगी मतदारसंघात आहे. सलग पाच वेळेस निवडून आलेल्या राजेश टोपेंच्या विरोधात निवडणूक लढवू इच्छिणारांची गर्दी सध्या दिसत आहे.