ठाणेः राज्यात एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुप्त संघर्षाच्या बातम्या येत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातही भाजप आणि शिवसेनेत वादाच्या ठिणग्या उडू लागल्या आहेत . वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात शतप्रतिशत भाजपची घोषणा करत जनता दरबार सुरू केला आहे. दुसरीकडे बदलापुरमध्ये आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांच्या संघर्ष सुरू आहे. तिसरीकडे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाणही आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेत दरी वाढल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपात सारे काही आलबेल नसल्याचे चित्र दिसू लागले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून सुरू झालेला वाद पुढे खाते वाटप आणि पालकमंत्री पदापर्यंत पोहोचला. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद अजुनही संपलेला नाही. त्यात ज्या ठिकाणी भाजपचे पालकमंत्री नाही त्या ठिकाणी भाजपचे प्रभारी नेमले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित असल्याचे वृत्त सातत्याने समोर येते. तर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकांनंतर उपमुख्यमंत्री शिंदे पुन्हा बैठका घेत असल्याचेही दिसून येते आहे. या स्वतंत्र आढावा बैठकांमुळे महायुतीतील शिवसेना आणि भाजपात सारे काही ठीक नसल्याचे बोलले जाते आहे. वर राज्यात ही स्थिती असताना खाली जिल्ह्याजिल्ह्यांमध्येही हीच स्थिती उद्भवू लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्यात आपले अस्तित्व ठळकपणे दाखवण्यास सुरूवात केली आहे. नाईक आणि शिंदे यांच्यातील संघर्ष लोकसभेवेळी उघडपणे दिसून आला. विधानसभेतही त्याची प्रचिती आली. त्यानंतर नाईक मंत्री झाल्यानंतर त्यांनी थेट शिंदेंच्या ठाण्यात स्वतंत्र सुभा सुरू केला. भाजपच्या छताखाली आता नाईक ठाण्यात जनता दरबार घेऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी बोलताना त्यांनी ठाण्यात शतप्रतिशत भाजपची घोषणा केली होती. त्यामुळे शिंदे विरूद्ध नाईक हा संघर्ष येत्या पालिका निवडणुकांमध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातल्या मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर अशा तालुक्यांवर पकड असलेले किसन कथोरे आणि शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यातही गेल्या काही दिवसात संघर्ष टोकाला जात असल्याचे समोर आले आहे. विधानसभेपूर्वीपासूनच कथोरे – म्हात्रे संघर्षाला सुरूवात झाली. विरोधानंतरही कथोरे यांनी विधानसभा जिंकली. आता आगामी पालिका निवडणुका म्हात्रे यांच्यासाठी महत्वाच्या आहेत. मात्र कथोरे यांनी कुळगाव बदलापूर नगरपालिकांमध्ये भाजपची ताकद दाखवून देऊ. भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकते असा दावा कथोरे यांनी केला आहे. त्यामुळे राज्य आणि जिल्ह्यात सुरू असलेला वाद स्थानिक पातळीवरही ठळकपणे दिसून येतो आहे. त्यातच भाजपस संघटनेत कार्यकारी अध्यक्ष पदावर विराजमान झालेल्या रविंद्र चव्हाण यांनीही आता आक्रमकपणे संघटनात्मक राजकारण सुरू केले आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप आणि शिवसेनेतील हा संघर्ष अधिक वाढत जाण्याची शक्यता आहे.