नाशिक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार यात्रेतून शिवसेनेने (शिंदे गट) आगामी कुंभमेळा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यावर पकड कायम राखण्यासाठी नाशिकच्या पालकमंत्रीपदावरील दावा सोडला नसल्याचे अधोरेखीत झाले. बदलत्या राजकीय समीकरणात विरोधी पक्षातील माजी नगरसेवकांचा कल भाजपऐवजी शिंदे गटाकडे अधिक्याने असल्याचे दिसत आहे.
महायुतीतील अंतर्गत वादातून नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपच्या गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला चोवीस तासांत स्थगिती दिली गेली होती. जवळपास महिनाभराचा कालावधी उलटूनही नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. महायुतीच्या आधीच्या सरकारमध्ये हे पद शिंदे गटाकडे होते. यावेळी ते अडून बसल्याने भाजप आणि सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीचीही (अजित पवार) कोंडी झाली. कुंभमेळा आणि महापालिका निवडणुकीमुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदाला कमालीचे महत्व आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक दौऱ्यात कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी कुंभमेळा नियोजनाची जबाबदारी सांभाळणारे गिरीश महाजन अनुपस्थित तर, माजी पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळा कार्यकारी समितीचे अध्यक्ष महाजन हे पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे येऊ शकले नाहीत, असे नमूद करत शिंदे यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदावर शिंदे गटाचा दावा कायम असल्याचे संकेत दिले. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास व्यक्त केला.
प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या तयारीचा अभ्यास करण्यासाठी नाशिकच्या अधिकाऱ्यांचे पथक उत्तर प्रदेशला जाणार आहे. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला. मुंबईतील मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी बैठकीतून संपर्क साधून अधिक कालावधी लागणाऱ्या कामांचे प्रस्ताव अर्थसंकल्पापूर्वी सादर करण्याची सूचना केली. आगामी कुंभमेळ्यावर आपलाही प्रभाव राखण्यासाठी शिंदे गट सक्रिय झाल्यामुळे पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच अधिक तीव्र झाल्याचे दिसत आहे.
मनपात संघर्ष अटळ
गतवेळी महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता होती. एकसंघ शिवसेनेची त्यांना गरज भासली नव्हती. आता पालकमंत्रीपद स्वत:कडे राखून शहर, जिल्ह्यावर आपले प्रभृत्व राखण्याचा भाजप आणि शिवसेनेचा (एकनाथ शिंदे) प्रयत्न आहे. त्यातून विरोधी पक्षातील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसाठी शिंदे गटाने दरवाजे खुले केले आहेत. मागील निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेशासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची रिघ लागली होती. आता मात्र सर्वपक्षीय माजी नगरसेवकांचा पसंतीक्रम बदलला असून ते शिंदे गटाकडे प्रामुख्याने आकर्षित होत आहेत. आतापर्यंत ३० पेक्षा अधिक माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत. दिवसागणिक ही संख्या वाढत असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपमध्ये संघर्ष अटळ मानला जात आहे.