अकोला : पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यात पडझडीमुळे शिवसेना शिंदे गटात अंतर्गत खदखद निर्माण झाली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची दरी असून पराभवावरून एकमेकांकडे बोट दाखवले जात आहे. स्वपक्षीय नेत्यांनाच विरोध होत असल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महायुतीमध्ये अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेने विधानसभेच्या पाच जागा लढवल्या. त्यापैकी चार जागांवर शिवसेना शिंदे गटाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. अकोला जिल्ह्यातील बाळापूरच्या जागेसाठी शिवसेनेने प्रतिष्ठेचा विषय केला होता. ऐनवेळी उमेदवारही भाजपमधून आयात करण्याची वेळ शिवसेनेवर आली. बळीराम सिरस्कारांच्या उमेदवारीवरून प्रचंड नाराजी होती. प्रचारात अनेक वेळा उमेदवार व पदाधिकाऱ्यांमध्ये वादाचे खटके उडाले. निवडणूक निधीसह अनेक कारणावरून वाद विकोपाला गेला. महायुतीत कुठलाही समन्वय नव्हता. त्यामुळे बाळापूरमध्ये शिवसेनेला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. सिरस्कारांची तिसऱ्यास्थानी घसरण झाली. ठाकरे गटाने ही जागा कायम राखत शिवसेना शिंदे गटाला शह दिला. या मोठ्या पराभवासाठी जबाबदार कोण? यावरून आता चर्चा सुरू झाली. पक्षांतर्गत काहींनी विरोधात काम केल्याचे देखील बोलल्या जात आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोडमध्ये सुद्धा शिवसेना तिसऱ्या स्थानावर गेली. भावना गवळी यांना विधान परिषदेवर संधी दिली असतांनाही त्या विधानसभेच्या रिंगणात उतरल्या, हे अनेकांना खटकले. महायुतीतील वाद काँग्रेसच्या पथ्यावर पडला. पराभवानंतरही भावना गवळी यांनी मंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी केली होती. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. आता वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून शिवसेनेतील अंतर्गत वाद उभाळून आला. मंत्री संजय राठोड व आमदार भावना गवळी यांच्यातील मतभेद काही नवीन नाहीत. त्यातूनच युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मंत्री संजय राठोड यांना वाशीमचे पालकमंत्री पद देण्यास विरोध केला जात आहे. संजय राठोड यांनी गवळींना मंत्रिपद मिळण्यास विरोध केल्याचा आरोप करण्यात आला.

हेही वाचा : Rahul Gandhi : राहुल गांधींनी प्रतिष्ठेला धक्का पोहचवाल्याचा आरोप करणाऱ्या भाजपाच्या महिला खासदार आहेत कोण?

बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक तीन जागा शिवसेना शिंदे गटाने लढवल्या आहेत. मेहकरमध्ये शिंदे गटाचा चार हजार ८१९ मतांनी पराभव झाला. ही जागा ठाकरे गटाने जिंकली. सिंदखेडराजा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत झाली. त्याठिकाणी देखील शिवसेना शिंदे गटाचा मोठा पराभव होऊन तिसऱ्या स्थानावर पक्ष घसरला. बुलढाणा मतदारसंघात अवघ्या ८४१ मतांनी शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटावर निसटता विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीनंतर बुलढाण्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला. मंत्र्यांनीच पराभवासाठी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आमदारांनी केला. याशिवाय महायुतीतील अनेक नेत्यांना देखील त्यांनी लक्ष्य केले. विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर पश्चिम वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद विकोपाला गेला. पक्षाच्या अपयशाची जबाबदारी कोण स्वीकारणार? हा आता खरा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा : Congress Views on Savarkar : काँग्रेसचे सावरकरांबद्दलचे विचार कसे कठोर होत गेले?

पश्चिम वऱ्हाडात भाजपचे यश, तर शिवसेनेचे अपयश

पश्चिम वऱ्हाडात भाजपने लढलेल्या १० जागांपैकी नऊ जागांवर विजय मिळवला. शिवसेना शिंदे गटाने पाच जागा लढवल्या, मात्र केवळ बुलढाणाच्या जागेवर विजय मिळवता आला. राष्ट्रवादी अजित पवार गटाने सिंदखेडराजामध्ये मैत्रीपूर्ण लढत देत जागा जिंकली.
चौकट

ठाकरे गटाचे वर्चस्व

शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची बाळापूरची जागा ठाकरे गटाने कायम राखली. शिवसेनेचा गड म्हणून ओळख असलेल्या मेहकरमध्ये देखील शिवसेनेने विजय मिळवला. त्यामुळे पश्चिम वऱ्हाडात शिवसेना शिंदे गटाच्या तुलनेत ठाकरे गटाचे वर्चस्व सिद्ध होते.