नागपूर: लोकसभा निवडणुकीत रामटेक आणि यवतमाळ -वाशीम या दोन पारंपारिक मतदारसंघात पराभव पत्करावा लागलेल्या शिवसेनेने (शिंदेगट) या दोन्ही मतदारसंघातील माजी खासदारांना विधान परिषदेत पाठवून विदर्भातील राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत यवतमाळ वाशीमच्या माजी खासदार भावना गवळी आणि रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाने विजयी झाले. या दोन्ही नेत्यांची लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्याऐवजी नवे चेहरे मैदानात उतरवले होते. मात्र हा निर्णय अंगलट आला व दोन्ही ठिकाणी शिवसेना पराभूत झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामटेकमध्ये तुमाने दोन वेळा खासदार होते ती जागा आता काँग्रेसने जिंकली तसेच यवतमाळ -वाशीमची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जिंकली. त्यामुळे या दोन्ही हक्काच्या मतदारसंघात शिवसेनेची ताकद कमी झाल्याचा संदेश गेला होता. तसेत तुमाने आणि गवळी नाराज होते. त्यांच्या पुनर्वसनाचाही प्रश्न होता. शिंदे यांनी या नेत्यांना विधान परिषदेत पाठवून लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची परतफेड केली आहे. यामुळे विदर्भातील दोन्ही मतदारसंघात शिंदे यांना त्यांचा पक्षवाढीसाठी मदत होणार आहे.

हेही वाचा : ना किमान समान कार्यक्रम ना समन्वयक! आताची एनडीए वाजपेयींच्या काळापेक्षा वेगळी कशी?

तुमानेंचा फायदा, पारवेंचे काय?

रामटेक लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारले म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृपाल तुमाने यांना विधान परिषदेत पाठवले. यामुळे तुमाने यांचा फायदाच झाला. मात्र काँग्रेसच्या आमदारपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आलेले व पराभूत झालेले राजू पारवे यांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. तेलंही गेले आणि तुपही गेले , अशी अवस्था आता पारवे यांची होण्याची शक्यता आहे. राजू पारवे हे २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून उमरेड विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विजयी झाले होते. रामटेकची जागा भाजपला लढवायची होती व त्यांच्याकडे उमेदवार नव्हता म्हणून त्यांनी राजू पारवे यांच्यावर जाळे फेकले. त्यात तेअडकले पण शिंदे गटाने रामटेकची जागा काही भाजपसाठी सोडली नाही, त्यामुळे पारवेंची अडचण झाली होती. वेळेवर भाजपने त्यांना शिवसेनेत पाठवून या पक्षाची उमेदवारी दिली. पण लोकसभा निवडणुकीतही पराभूत झाले. त्यामुळे पारवे यांची कोडी झाली आहे. शिवसेनेत त्यांना बाहेरचे मानले जाते, भाजपमध्ये ते इच्छा असूनही आता प्रवेश करू शकत नाही कारण उमरेडमधूनच त्यांना विरोध आहे , काँग्रेस तर त्यांनीच सोडली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत उमरेडमधून त्यांना सेनेकडून पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते, पण या जागेवर भाजपचा दावा आहे. त्यामुळे पारवेंचे पुनर्वसन करायचे कसे हा प्रश्न शिंदे सेनेपुढे निर्माण झाला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena eknath shinde faction krupal tumane and bhavana gawali on won mlc polls print politics news css