विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटानेही मंगळवारी त्यांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली. या यादीत २०२२ मध्ये बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या ४१ पैकी ३७ आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. त्यानंतर आता विविध राजकीय चर्चांनाही उधाण आलं आहे.

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) पहिल्या यादीत ज्या चार आमदारांची नावे नाहीत, यात विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम), शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण), बालाजी किणीकर (अंबरनाथ) आणि श्रीनिवास वनगा (पालघर) यांचा समावेश आहे. या चौघांची नावं दुसऱ्या यादीत येतील, अशी शक्यता आहे. यासंदर्भात बोलताना श्रीनिवास वनगा यांनी त्यांना उमेदवारी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. ”आम्हाला एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. लवकरच पक्षाची दुसरी यादी जाहीर होईल, त्या यादीत माझं नाव असेल”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – भंडाऱ्यात महायुतीतील नाराजीच्या ठिणगीचे वणव्यात रुपांतर! नरेंद्र भोंडेकर यांच्याविरोधात इच्छुकांची अपक्ष लढण्याची तयारी

खरं तर महायुतीचं अंतिम जागावाटप जाहीर झालेलं नसलं तरी एकनाथ शिंदे यांची शिवसेना ८०-८५ जागा लढवणार असल्याचे बोललं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील विद्यमान सहा आमदारांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. तसेच आठ अपक्षांनाही पक्षात प्रवेश देत त्यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे काही नेत्यांच्या जवळच्या नातेवाईकांनाही उमदेवारी देण्यात आली आहे.

ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून केदार दिघे यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. असं झालं तर कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात चुरशीची लढत बघायला मिळणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माहीममधून सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांची थेट लढत ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत आणि मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांच्याशी होणार आहे. बुधवारी ठाकरे गटाने माहीममधून महेश सावंत यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर माहीममध्ये उद्धव ठाकरे उमेदवार देणार नाहीत, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

हेही वाचा – Amit Thackeray: अमित ठाकरेंमुळे ‘एकच आमदार’ हा शिक्का पुसला जाणार? उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी राज ठाकरेंची खेळी काय?

माजी राज्यमंत्री आणि औरंगाबादचे खासदार संदीपान भुमरे यांचा मुलगा विलास भुमरे यांना पैठणमधून उमेदवारी देण्यात आली आहे, तर मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना जोगेश्वरी पूर्वमधून संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांना राजापूर मतदारसंघातून पक्षाचे तिकीट देण्यात आलं आहे.

अमरावतीचे माजी खासदार आनंद अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ हे दर्यापूरातून पक्षाचे उमेदवार आहेत. माजी आमदार अनिल बाबर यांचा मुलगा सुहास बाबर आणि विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांचा मुलगा आमो पाटील यांना अनुक्रमे खानापूर आणि एरंडोल या मतदारसंघातून उमदेवारी जाहीर झाली आहे.

अर्जुन खोतकर यांना जालन्यातून उमेदवारी देण्यात आली आहे, तर आशीष जैस्वाल रामटेकमधून, मंजुलाताई गावित साक्रीतून आणि नरेंद्र भोंडेकर यांना भंडारा मतदारसंघातून उमदेवारी देण्यात आली आहे. उदय सामंत, दीपक केसरकर आणि संजय राठोड यांना अनुक्रमे रत्नागिरी, सावंतवाडी आणि दिग्रसमधून, तर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना सिल्लोडमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

Story img Loader