सुहास सरदेशमुख

मशिदीवरील भोंगे उतरविण्याच्या उपक्रमाला अधिक गती देण्यासाठी राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभा घेतल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी औरंगाबाद शहर हे सभा केंद्र बनू लागले आहे. आता शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वर्धापन दिनी म्हणजे ८ जून रोजी येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू झाली असून त्यासाठी शहर व ग्रामीण भागात १५०० बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

केवळ शहरातून शिवसेनेच्या विचाराचे एक लाख लोक सभेला येतील. पहाटे फिरायला येणाऱ्या व्यक्तीपासून ते बाजारपेठेतील व्यापाऱ्यापर्यंत संपर्क केला जाईल. त्यातून विचारांनी भारावलेले सैनिक शहरभर दिसतील, अशारितीने जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी नियोजन सुरू केले आहे. पाणी मोर्चाच्या निमित्ताने भाजपने संघटनात्मक बांधणी केल्यानंतर आता शिवसेना मैदानात उतरली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर औरंगाबादमध्ये आक्रमक असणाऱ्या शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक असून कोणत्या वाॅर्डातून व गावातून किती शिवसैनिक सभेला येऊ शकतील, याचे आराखडे बनविले जात आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावात शिवसेनेची बैठक होईल. तत्पूर्वी शहरातील तीन मतदारसंघांत वाॅर्डनिहाय बैठका घेतल्या जात असून या सर्व बैठका जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी घेतल्या आहेत. त्यांच्या मते आता शहरातील पदाधिकारी वाॅर्डनिहाय बैठका घेणार असून संख्यात्मकदृष्ट्या जूनमध्ये होणारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा पूर्वीच्या गर्दीचे सर्व नोंदी मोडीत काढतील, अशी रचना केली जात आहे. 

भोंगेप्रकरणावर भाष्य करणाऱ्या राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर औरंगाबादमध्ये टीका केली नव्हती. तसेच एमआयएमच्या अकबरोद्दीनसारख्या आक्रमक नेत्यानेही मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली नव्हती. मात्र, महापालिकेच्या कारभारावरून तसेच संभाजीनगरचे नामांतर करण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. महाविकास आघाडीचे सरकार पाणीविरोधी सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याला औरंगाबाद शहरातील पाणीपुरवठा योजनेचे संथ गतीने सुरू असणाऱ्या कामाची पार्श्वभूमी होती. त्यामुळे औरंगाबादमध्ये होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेची उत्सुकता सर्वत्र आहे.

शहरात पहाटे फिरण्यास जाणारे तसेच व्यायामशाळांमध्ये जाणाऱ्यांपर्यंत सभेची माहिती पोहोचिवण्यासाठी सकाळी साडेपाच ते साडेसातपर्यंत संपर्क करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यांना पत्रकेही दिली जाणार आहे. केवळ एवढेच नाही तर गाव आणि वाॅर्डनिहाय बैठकांबरोबरच शिवसेनेच्या अंगीकृत संघटनांच्या बैठकाही घेतल्या जात असून कामगार सेना, वाहतूक सेना, अल्पसंख्याक व दलित आघाडी, महिला आघाडी तसेच अन्य संघटनांची बैठकाही घेतल्या जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचा बैठकांचा धडका सुरू झाला आहे.

Story img Loader