हर्षद कशाळकर

रायगड जिल्ह्यातील तीनही आमदारांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली आहे. आता या आमदारांची त्यांच्याच मतदारसंघात कोंडी करण्याचे धोरण शिवसेनेने स्वीकारल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात जाऊन मेळावे घेणे, संघटना टिकून रहावी यासाठी प्रयत्न करणे आणि दुसऱ्या बाजूला बंडखोर आमदारांवर टिका टिप्पणी करून त्यांची बदनामी करण्याचे धोरण पक्षनेतृत्वाने स्वीकारल्याचे दिसून येत आहे.

कर्जत मधील आमदार महेंद्र थोरवे यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने बुधवारी कर्जत येथे मेळावा घेतला. या मेळाव्याला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीने गर्दी जमवून या वेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. कर्जत मधील दोन नगरसेवक आणि दोन पदाधिकारी वगळता, बहुसंख्य पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते. आमदारांच्या बंडामुळे पक्ष संघटनेला कुठलाही धोका निर्माण झालेला नाही, असे  या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेने दाखवून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आमदार महेंद्र थोरवेंवर टीका केली. आमदार महेंद्र थोरवे हेच विकास कामे अडवत होते. नगरपालिकांना निधी देण्यास त्यांचा विरोध होता असा दावाही त्यांनी आपल्या भाषणात केला. बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील आणि दादा भुसे यांनाही त्यांनी लक्ष्य केले.

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी अलिबाग येथे शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते. अलिबाग, पेण, रोहा आणि मुरुड तालुक्यातून या मेळाव्यासाठी शिवसैनिकांना बोलविण्यात आले होते. यावेळी राऊतांनी बंडखोर आमदारांवर तोंडसुख घेतले. शंभर गोठ्यातील शेण काढून आमदार महेंद्र दळवी शिवसेनेत आले होते. ते गेले, आता बैल बदलायची वेळ आल्याची टिका यावेळी त्यांनी केली. तर महाडच्या भूताला बाटली बंद करण्याची वेळ आल्याची टिप्पणी करत अनंत गीते यांनी भरत गोगावले यांच्यावर टीका केली.

शिवसेनेच्या जुन्या जाणत्या सर्व पदाधिकाऱ्यांना मंचावर बोलवून आमदार एकाकी पडल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. आमदार गेले तरी शिवसेना संघटना खंबीर असल्याचा संदेश या मेळाव्यांच्या माध्यमातून देण्यात आला. लवकरच महाड येथेही असाच मेळावा घेणार असल्याचे अनंत गीते यांनी जाहीर केले. पक्षांतर्गत कारवाई होऊ नये म्हणून आज बहुसंख्य पदाधिकारी शिवसेनेबरोबर असले तरी त्यामुळे जिल्ह्यात परतल्यानंतर तिन्ही आमदारांना कोणत्या परिस्थितीला सामोरेजावे लागते, ते पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.    

Story img Loader