मुंबई : जातीच्या राजकारणावर स्वार होत राष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिमा तयार करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठीच त्यांनी नवी दिल्लीत बंजारा समाजाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. राठोड हे राज्यातील बंजारा समाजाचे नेते आहेत. त्यांना आता बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेतृत्व करायचे आहे. त्यासाठी त्यांनी दिल्लीत कार्यक्रम ठेवला आहे.
राज्यात दीड कोटी तर देशपातळीवर १२ कोटी बंजारा समाजाची लोकसंख्या आहे. त्यामुळे राठोड यांना प्रत्येकवेळी मंत्रीपदाची संधी मिळालेली आहे. संत सेवालाल आणि रुपसिंग महाराज यांच्यावर या समाजाची श्रद्धा आहे. त राठोड यांनी दिल्लीत भव्य जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला प्रमुख पाहुणे आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजाचे राष्ट्रीय संघटने केले होते. त्याच धर्तीवर राठोड बंजारा समाजाचे संघटन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
एका युवतीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते. तेव्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या राठोड यांना राजीनामा देणे भाग पडले होते. राज्यात सत्तांतर झाल्यावर राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. राठोड यांना समाजाचा असलेला पाठिंबा लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राठोड यांना मंत्रिपद दिले होते. विदर्भ व मराठवाड्यात बंजारा समाज लक्षणीय आहे. यातूनच राठोड यांना महत्त्व देण्यात येते. राष्ट्रीय पातळीवर समाजाचे नेतृत्व करीत आपली प्रतिमा अधिक उजळ करण्याचा राठोड यांचा प्रयत्न आहे.