सतिश कामत
सध्याच्या बिकट राजकीय परिस्थितीत शिवसेना पक्ष पुन्हा उभा करायचा असेल तर सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्यापासून दूर गेलेल्यांशी चर्चा करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण उदय सामंत यांनी व्यक्त केली.
गेले काही दिवस मुंबईत चाललेल्या राजकीय नाट्यानंतर सामंत यांचे शुक्रवारी सकाळी पाली येथील निवासस्थानी आगमन झाले . या प्रसंगी पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना त्यांनी सद्यस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, मी गुवाहाटीला गेलो असल्याच्या बातम्या आल्या. पण मी शिवसेनेतच आहे. पण हा विषय चिघळला तर भविष्यात कायदेशीर लढाई अटळ आहे. सध्याच्या दूषित राजकीय वातावरणात कोण काय बोलले यावर मी मत व्यक्त करणे उचित वाटत नाही. कारण मी जोडणारा आहे, तोडणारा नाही. मला हे सर्व पुन्हा जोडावे असे वाटते. पक्ष पुन्हा उभा करायचा असेल तर मला वाटते की, सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्यापासून दूर गेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करणे गरजेचे आहे. आमच्या लोकांमध्ये जे गैरसमज असतील ते दूर करणे गरजेचे आहे.