बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेले खरे, पण त्यांच्या मनाची चलबिचल सुरूच होती…उत्तररात्री सुरतहून गुवाहाटीकडे जाण्याचे निश्चित झाले तेव्हा देशमुखांची अस्वस्थता आणखी वाढली…पण, सुरतहून सुटका शक्य नव्हती….त्यामुळे त्यांनी नाईलाजाने गुवाहाटीला नेणाऱ्या विमानात पाय ठेवले…पण, मनात वेगळीच योजना आकार घेत होती…ती योजना त्यांनी मुंबई येथील शिवसेनेचे नगरसेवक महादेव गवळे, अकोला जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांना सांगिततली…त्यांनी पुढची सर्व तयारी करून ठेवली….अखेर गुवाहाटी विमानतळावर उतरताच देशमुखांनी ‘गनिमी काव्याचा’ वापर करीत मोठ्या शिफातीने खास त्यांच्यासाठी सज्ज असलेले खासगी विमान (चार्टर्ड प्लेन) गाठले व त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रमाणे स्वत:ची सुटका करून घेतली होती, त्याच घटनेला आदर्श मानून आपण शिताफीने परत आलो, असे आमदार नितीन देशमुख यांनी ‘लोकसत्ता’शी बोलतांना सांगितले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मात्र असे काहीच घडले नसून आमच्याच दोन सहकाऱ्यांनी त्यांना विमानतळावर सोडले, असा दावा केला.
गुवाहाटी विमानतळावरून नागपूरला येण्यासाठी आमदार देशमुख यांच्या करिता खासगी विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. ‘व्हेंचुरा एव्हिएशन’ कंपनीचे ‘व्हीटी-व्हीआरएस’ हे विमान असल्याची माहिती आहे. या खासगी विमानाची व्यवस्था नेमकी कुणी व कशी केली, हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. नितीन देशमुख यांनी विशेष खासगी विमानाने परत नागपूरमार्गे अकोला गाठण्यामागे नेमकी कोणती राजकीय समीकरण आहेत, यावरून चर्चा सुरू झाली आहे.