नितीन पखाले
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या मागे गेल्या वर्षभरापासून सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. तेव्हापासून खासदार गवळी यांचे जनतेला दर्शन झालेले नाही. दरवर्षी खरीप हंगामाच्या वेळी पीकविमा, बियाणे आदी मुद्यांवर गवळी यांचे एकतरी आंदोलन ठरलेले असते. यावेळी मात्र अशा कोणत्याच आंदोलनाची तयारी शिवसेनेत दिसत नाही. त्यामुळे आंदोलक लोकप्रतिनिधी म्हणून असलेली गवळी यांची प्रतिमा त्यांच्या अलिप्ततेमुळे धोक्यात तर नाही ना, अशी भीती आता त्यांच्या समर्थकांमध्येही व्यक्त होत आहे. रिसोड (जि.वाशीम) येथील बालाजी पार्टिकल्स या कारखाना विक्री व अन्य आर्थिक गैरव्यवहारांसंदर्भात गवळी व त्यांच्या निकटवर्तीयांना सक्तवसुली संचालनालयाने चौकशीच्या फेऱ्यात पकडले आहे. विशेष म्हणजे, वाशीम येथील शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख व बालाजी पार्टिकल्स कारखान्याच्या तत्कालीन संचालकांनी या कारखान्यातील गैरव्यवहारांविरोधात तक्रारी केल्या. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून गवळी यांच्यामागे कारवाईचा ससेमिरा सुरू आहे. सातत्याने ईडीच्या नोटीस येत असल्याने त्याचा परिणाम खा. गवळी यांच्या राजकीय प्रवासावरही झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खा. गवळी पूर्वीप्रमाणे लोकांमध्ये दिसत नसल्याने मतदार आणि शिवसैनिकही अस्वस्थ आहेत. खासदारच भेटत नसल्याने जनतेने आपल्या व्यथा कोणापुढे मांडाव्या, असा प्रश्न यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावपासून वाशिममधील रिसोडपर्यंत उपस्थित होत आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून डावलल्या जात असल्याची गवळी समर्थकांची धारणा झाली आहे. पक्षप्रमुख व शिवसेनेतील इतर नेतेही या अडचणीच्या काळात ‘ताईं’सोबत नसल्याची खंत अनेक शिवसैनिक व्यक्त करत आहेत. पक्षस्तरावर वरिष्ठ नेत्यांकडून ईडीच्या कारवाईविरोधात कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांचे समर्थक आता उघडपणे करत आहेत. शिवाय यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्याशी राजकीय वैमनस्य सुरू असल्याने पक्षात स्थानिक पातळीवरही गवळी यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. भावना गवळी या शिवसेनेच्या एकमेव महिला खासदार (लोकसभा) आहेत. खासदार म्हणून त्या पाचव्यांदा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. मात्र एवढ्या प्रदीर्घ कालावधीत कोणतीही ठोस विकासकामे त्यांच्या नावावर यवतमाळ किंवा वाशीम जिल्ह्यात नसल्याचा आरोप त्यांचे विरोधक करतात.

ज्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाचे श्रेय त्या घेतात तोही राज्यसभेचे तत्कालीन खासदार विजय दर्डा व अन्य लोकप्रतिनिधींच्या सततच्या पाठपुराव्याने मार्गी लागला, असे विरोधक सांगतात. गेल्या २५ वर्षांत खा. भावना गवळी यांना विकासाची कोणतीही छाप पाडता आली नसल्याने नागरिकांमध्येही आता ओरड सुरू आहे. दरवेळी निवडणूक जिंकण्याबाबत त्या नशीबवान म्हणून प्रसिद्ध आहेत. भावनिक आणि जातीय समीकरणे, शिवसेनेमुळे दिग्रस-पुसद विधानसभा मतदारसंघातील बंजारा समाजाची एकगठ्ठा मते ऐनवेळी त्यांच्या पारड्यात पडायची. त्यामुळे गवळी यांना प्रत्येकवेळी निवडणूक सोपी गेली, असे राजकीय विश्लेषक सांगतात. मात्र ईडीची चौकशी मागे लागल्यापासून गवळी यांनी यवतमाळ जिल्ह्याशी घेतलेली फारकत अनेकांना खटकत आहे. यात विरोधकांसह त्यांच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. ताईंसोबत चर्चाच होत नसल्याने नागरिकांना काय उत्तर द्यावे, असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

‘ताई’नसल्या तरी, कामे सुरूच!

सहा महिन्यांपासून भावना गवळी यवतमाळला आल्या नसल्या तरी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातून सर्व कामे नियमितपणे सुरू आहेत. खासदार विकासनिधीची सर्व कामे, जनतेच्या तक्रारी सोडविणेही सुरू आहे. ताई प्रत्यक्ष यवतमाळमध्ये येत नसल्या तरी सर्वांशी दूरध्वनीवर संपर्कात आहेत. ताई येत नसल्याबाबत जनतेच्या कोणत्याही तक्रारी नसून, विरोधक जाणीवपूर्वक तसे चित्र निर्माण करीत आहेत.

नितीन बांगर, शिवसेना यवतमाळ शहर प्रमुख.

गवळी लोकप्रतिनिधींची कर्तव्ये विसरल्या!

जनतेने निवडून दिलेल्या खासदार असूनही गवळी या वैयक्तिक प्रश्न सोडविण्यात व्यस्त आहेत. लोकप्रतिनिधी हा आधी लोकांचा असतो, नंतर स्वत:चा. मात्र ईडी चौकशीचा ससेमिरा सुटावा यासाठी जंगजंग पछाडणाऱ्या गवळी या लोकप्रतिनिधींची कर्तव्ये विसरल्या आहेत. शिवाय एक महिला प्रतिनिधी असूनही जिल्ह्यातील महिलांना त्यांनी वाऱ्यावर सोडले आहे. येत्या काही दिवसांत त्या यवतमाळात दिसल्या नाही तर भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.

शैला मिर्झापूरे, भाजप जिल्हा सचिव, यवतमाळ.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mp bhavana gawali is avoiding to appear in public after receiving notice from ed print politics news pkd
Show comments