दयानंद लिपारे
शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठेच्या आणाभाका घेऊन शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी उभे राहणाऱ्या काही लोकप्रतिनिधींमध्ये आता कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचाही समावेश झाला आहे. ‘ गेले ते बेन्टेक्स उरले, ते सोने‘ अशा शब्दांत शिंदे गटात जाणाऱ्या बंडखोर आमदारांची हेटाळणी करणारे खासदार संजय मंडलिक यांनी सोन्याचा त्याग करत बेन्टेक्स का बरे कवटाळले असा झणझणीत प्रश्न त्यामुळे कोल्हापुरातील मतदार विचारत आहेत.
हेही वाचा- संस्थात्मक हितसंबंध डोळ्यांसमोर ठेवत हेमंत पाटील शिंदे गटात
वडील सदाशिवराव मंडलिक यांच्याप्रमाणे लोकसभेत जाण्याचा संजय मंडलिक यांचा संकल्प पूर्ण झाला तो शिवसेनेमुळे. पण बदललेल्या राजकीय समीकरणांत आपले लोकसभा विजयाचे ध्येय पुन्हा पूर्ण करण्यासाठी त्यांनी मातोश्रीची साथ सोडून शिंदे गटात दाखल होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील समीकरणांत सोन्याला कोणी वाली राहील की नाही या विचाराने मंडलिक यांनी बेन्टेक्स कवटाळल्याची चर्चा आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व आता शिंदेसेना असा प्रवास करणाऱ्या मंडलिक यांचा आगामी राजकीय प्रवास रोचक ठरणार आहे.
संजय मंडलिक हे कोल्हापुरातील लोकप्रिय नेते दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र. सदाशिवराव हे कागल तालुक्यातील सामान्य कार्यकर्ते. त्यांनी विद्यार्थी दशेपासून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतलेला. १९६७ साली ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. पुढे त्यांनी तीन वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली. शरद पवार यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी जलसंपदा, शिक्षण विभागाचे राज्यमंत्री पद सांभाळले. तीन वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवून ते खासदार झाले. प्रथम काँग्रेस. दुसऱ्यांदा राष्ट्रवादी. पवार यांच्याशी मतभेद झाल्यावर तिसऱ्यावेळी अपक्ष म्हणून. जिल्ह्याच्या राजकीय, सहकार पटलावर त्यांचा प्रभाव राहिला. सदाशिवराव मंडलिक – हसन मुश्रीफ यांच्यातील वाद राज्यभर गाजला. मंडलिक यांच्यासमवेत संजय मंडलिक यांनी राजकारणाची मुळाक्षरे गिरवली तो काळ कॉंग्रेसचा होता.
हेही वाचा- भाजपच्या वाटेवर असलेले नाशिकचे हेमंत गोडसे तूर्त शिंदे गटात
सदाशिवराव मंडलिक यांच्या निधनानंतर संजय मंडलिक यांनी लोकसभेत जाण्याचे स्वप्न पाहिले. तत्कालीन राजकीय परिस्थिती पाहून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पहिल्या निवडणुकीत ते राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याकडून पराभूत झाले. हार पत्करूनही त्यांनी शिवसेनेची बांधिलकी कायम ठेवली. पुढील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आमचं ठरलंय असे म्हणून संजय मंडलिक यांना उघडपणे साथ दिली. चंद्रकांत पाटील यांची रणनीती, भाजप -शिवसेनेला अनुकूल वातावरण, मुश्रीफ यांची छुपी साथ यामुळे संजय मंडलिक यांनी महाडिक यांच्यावर मात करून संसदेत पाऊल टाकण्याचे स्वप्न पूर्ण केले. उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे संबंध चांगले राहिले. इतकेच काय तर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर फुटीर आमदारांविरोधात त्यांनी जोरदार टीकास्त्र डागले होते. ‘ गेले ते बेन्टेक्स उरले, ते सोने ,’ अशा शब्दांत त्यांनी गद्दारांचा समाचार घेतला होता. त्यांच्या विरोधात त्यांनी मोर्चेही काढले.
पण नंतर संजय मंडलिक यांचे मतपरिवर्तन झाले. मंडलिक यांनी आता शिंदे यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे. शिंदे यांना साथ देणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीप्रमाणे मतदारसंघाचा विकास हे पाठिंबा देण्याचे कारण मंडलिक हेही सांगतात. तथापि, पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपची मदत मिळाली तरच निवडणूक जिंकणे सोपे आहे असा त्यांचा अंदाज आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचा प्रभाव, चंद्रकांत पाटील, महाडिक परिवार, समरजितसिंह घाटगे, प्रकाश आबिटकर या सर्वांची कुमक मिळाल्याने दुसऱ्यांदा लोकसभेत पोहोचणे सहज शक्य आहे, असा त्यांचा होरा आहे. खेरीज चंदगडचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील हे त्यांचे निकटचे नातलग असल्याने त्यांची अप्रत्यक्ष साथ मिळू शकते असाही एक अंदाज बांधला जात आहे. या सर्वांचा विचार करून संजय मंडलिक हे खासदारकी वाचवण्यासाठी शिंदे गटात दाखल झाले असले तरी २०२४ पर्यंत पंचगंगेतून बरेच पाणी वाहून जाईल आणि भाजपच्या पुढील राजकारणावरच संजय मंडलिक यांचे भवितव्य अवलंबून राहील, अशी चर्चा आहे.