भारताचे गृहमंत्री अमित शाह हे शनिवारी (१२ एप्रिल) रायगडावर आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची ३४५ वी पुण्यतिथी असल्याने अमित शाह महाराष्ट्रात आले होते. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, त्यांचं युद्धनिती, त्यांची स्वराज्यासाठीचं असलेलं योगदान या सगळ्याबाबत भाष्य केलं. यावेळी अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख काही ठिकाणी शिवाजी असा एकेरी केला. यामुळेच उद्धव ठाकरेंची शिवसेना संतापली आहे. आता आरोपांच्या फैरी झडत आहेत आणि राजकारणही रंगलं आहे.
अमित शाह यांचं वक्तव्य काय?
छत्रपती शिवरायांच्या पुण्यतिथीच्या या कार्यक्रमाला बोलवण्यात आलं हे मी माझं भाग्य समजतो. मी राजमाता जिजाऊंना नमन करतो. त्यांनी फक्त शिवरायांना जन्म दिला नाही तर बाल शिवाजीला त्यांनी स्वराज्य हा विचार दिला. बाल शिवाजीला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक घडवण्याचं काम राजमाता जिजाऊंनी केलं. सुवर्ण सिंहासन ज्या ठिकाणी होतं तिथे मी शिवाजी महाराजांना अभिवादन केलं त्यावेळी मनात उचंबळून आलेल्या भावना शब्दांत मांडता येणार नाहीत. मी अशा व्यक्तीच्या राजदरबारात उभा होतो ज्या व्यक्तीने स्वराज्य, स्वधर्म यासाठी त्यांना आयुष्य वेचलं. आदिलशाही, निजामशाही याने वेढलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बदलण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. स्वराज्याचं स्वप्न यशस्वी झालं. शिवाजी महाराजांच्या जन्माच्यावेळी महाराष्ट्र अंधकारात बुडाला होता. स्वराज्याची कल्पनाही कुणी करत नव्हतं. स्वधर्म आणि स्वराज्य याबाबत बोलणं लोक गुन्हा समजू लागले होते. १२ वर्षांच्या मुलाने हिंदवी स्वराज्यासाठी प्रतिज्ञा केली, भगवा फडकवण्यासाठी शपथ घेतली. मी आजवर अनेक नायकांची चरित्रं वाचली आहे. मात्र असं साहस आणि दृढ इच्छाशक्ती, अकल्पनीय रणनीती मी एकाही व्यक्तीमध्ये पाहिलं नाही.
छत्रपतींना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका-अमित शाह
छत्रपती शिवाजी महाराजांकडे धन नव्हतं, भूतकाळ त्यांच्यासह नव्हता, भविष्याबाबत काही माहिती नव्हतं. मात्र स्वराज्य या संकल्पनेतून त्यांनी ते निर्माण करुन दाखवलं आणि पाहता पाहता १०० वर्षांपासून सुरु असलेली मोगालाई संपुष्टात आणून दाखवली. अटकेपर्यंत शिवाजी महाराजांचे मावळे पोहचले, तामिळनाडू, बंगालपर्यंत पोहचले तेव्हा लोकांनी सुस्कारा सोडला की आता आपला देश, स्वधर्म, स्वभाषा आणि आपली संस्कृती वाचली. आज आपण संकल्प सोडू की स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा आपला देश सगळ्याच आघाड्यांवर क्रमांक १ ला उभा असेल. या विचारांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला आहे. जिजाऊंनी छत्रपती शिवरायांमध्ये स्वराज्याचं बीज रोवलं. त्याचा पुढे वटवृक्ष झाला. शिवाजी महाराजानंतर औरंगजेब आला होता तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, संताजी, धनाजी या सगळ्यांनी लढा दिला. स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्या औरंगजेबाचा मृत्यू इथेच झाला आणि त्याची समाधी इथेच बांधली गेली. मी आज महाराष्ट्राच्या जनतेला हात जोडून विनंती करतो की छत्रपती शिवरायांना महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवू नका. छत्रपती शिवाजी महाराजांपासून सगळा देश, सगळं जग प्रेरणा घेऊ शकतं. असं अमित शाह म्हणाले होते. त्यानंतर राजकारण रंगलं आहे. शिवाजी महाराज, बालशिवाजी, शिवराय असे शब्द वापरल्याने संजय राऊत आक्रमक झाले आहेत.
संजय राऊत अमित शाह यांच्या भाषणाबाबत काय म्हणाले?
रायगडवर अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने प्रवचन दिलं. पण तिथे महायुतीतला एकोपा दिसला नाही. एसंशी गटाचे लोक स्नेहभोजनाला नव्हते. रायगडावर जे भाषण अमित शाह यांनी केलं त्यावर इतकंच सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आम्हाला अमित शाह यांच्याकडून शिकावं लागणं इतकी वाईट वेळ आमच्यावर आलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार काय होता? त्यांची भूमिका काय होती? महाराष्ट्राने काय केलं पाहिजे वगैरे वगैरे हे औरंगजेबाप्रमाणे सूडाने कारवाया करणारे आम्हाला ज्ञान देणार आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेले छत्रपतींचे वंशज आणि जय जय करणारे लोक माना डोलवणार इतकी वाईट वेळ राज्यावर आलेली नाही. गेले तीन महिने यांचेच लोक औरंगजेबाचं थडगं उखडून टाकण्याच्या विचारांनी भारावून गेले होते. आम्ही औरंगजेबाचं थडगं किंवा कबर म्हणतो, औरंगजेबाची कबर उखडून टाकावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छावा चित्रपटाचे शो ठेवले होते. पण आम्ही ज्याला थडगं म्हणतो त्या औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख देशाच्या गृहमंत्र्यांनी समाधी असा केला. औरंगजेबाच्या थडग्याला देशाच्या गृहमंत्र्यांनी समाधीचा दर्जा दिला. रायगडावरुन छत्रपतींच्या साक्षीने समाधीचा दर्जा दिला यापेक्षा महाराष्ट्रात वाईट काय घडणार? मग इतक्या हाणामाऱ्या, दंगली कशाला घडवल्या? औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला त्याचा हा परिणाम आहे का? त्यामुळे औरंगजेबाविषयी इतकं प्रेम गुजरातच्या नेत्यांना आहे. हिंदुत्वाच्या शत्रूला समाधीचा दर्जा देण्याचं वक्तव्य अमित शाह यांनी केलं. छत्रपतींचे वंशज हे बाजूला बसलेले होते. त्यांना या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला हवा होता असंही संजय राऊत म्हणाले. तर संजय राऊत यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलं आहे?
अमितभाईंचं (अमित शाह) पाचशे पानी स्वतः तयार केलेलं पुस्तक आहे. हे पुस्तक छत्रपती शिवरायांवर आहे. त्यांनी संदर्भ गोळा केले आहेत पण ते पुस्तक त्यांचं आहे. येत्या काही दिवसांत ते पुण्यात प्रकाशित करायचं की दिल्लीत इतकाच मुद्दा राहिला आहे. ज्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय राऊत यांनाही चक्कर येईल. इतका अभ्यास अमित शाह यांनी केला आहे. अशा अमितभाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेत नाही तुम्हाला यायचं आहे पण घेत नाहीत. म्हणून किती दुस्वास करणार? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. तर चंद्रकांत पाटील यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. आता या प्रकरणात आणखी काय काय घडतं ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.