दीपक महाले
जळगाव: आपल्या सामाजिक कार्यातून प्रा. डॉ. सचिन भीमराव पाटील यांनी स्वतःची ओळख निर्माण करीत, तळागाळातील सर्वसामान्यांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी कायम पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या महासभांमध्ये अभ्यासपूर्ण मांडणी करण्याची हातोटी त्यांच्यात आहे, असा एक आश्वासक चेहरा जळगावकरांना लाभलेला आहे. प्रा. डॉ. सचिन पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून, ते विविध आंदोलनांमध्येही सहभागी असतात. प्रा. डॉ. पाटील यांनी २०१० मध्ये खानदेश बहुद्देशीय संस्था संचालित कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग व टेक्नॉलॉजी नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी अभियांत्रिकी पदवी व पदविका महाविद्यालयाची स्थापना जळगावात केली.
जिल्ह्यातील यावल तालुक्यातील डांभुर्णी या गावचे मूळ रहिवासी असणारे प्रा. डॉ. सचिन पाटील बी. ई. मेकॅनिकल, एम.टेक., पीएच.डी. असे उच्चविद्याविभूषित असून, राजकीय पटलावर आपली सुरुवात करीत असताना २०१७ मध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ५१ कुटुंबांना आर्थिक मदत करीत त्यांच्या अडचणी सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. २०१८ मध्ये गोरगरीब वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप त्यांनी केले.
हेही वाचा: रुपाली चाकणकर : आश्वासक नेतृत्व
नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या कामाचा एक स्वतंत्र असा वेगळा ठसा उमटविला. करोनाकाळात त्यांनी नगरसेवक सचिन पाटील मित्रमंडळ- मित्रपरिवारातर्फे पाचशे रिक्षाचालक व धुणीभांडी करणाऱ्या, हातमजुरी करणाऱ्या महिलांना किराणा साहित्याचे वाटप केले. त्याचबरोबर २०१८ ते २०२० दरम्यान शिक्षण सभापती असताना महापालिका शिक्षकांचे १८ महिन्यांचे रखडलेले वेतन त्यांनी सुरळीत केले. करोनाकाळात जळगाव शहरातील नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी ५० टक्के माफ करण्यात यावी, याबाबतचा ठराव त्यांनी महासभेत मांडला.
हेही वाचा: राहुल नार्वेकर : अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला संधी
आयुक्तांच्या दालनात धडक मोर्चा नेत पाणीपुरवठ्यासंदर्भातील काम तडीस नेले. यामुळे महापालिकेच्या वीज बिलालाही मर्यादा आली. शहरातील सदनिकांमधील घरांना स्वतंत्र नळ पाणीपुरवठा देण्यासंदर्भात त्यांनी महासभेत व वेळोवेळी झालेल्या समितीच्या सभेतही पाठपुरावा करून विषय तडीस नेला. नागरिकांच्या कोणत्याही अडचणींना धावत जाऊन अडचणी सोडविण्याचा सतत प्रयत्न करणारा नगरसेवक म्हणून सचिन पाटील जळगावकरांमध्ये सुपरिचित आहेत.