नागपूर : नागपूर जिल्ह्यातील दोन जागांसह विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवरून काँग्रेस व शिवसेना (ठाकरे) या दोन पक्षात निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी सोमवारी महाविकास आघाडीची बैठक होत आहे. त्यात जागा वाटपाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक, दक्षिण नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, भंडारा शहर या विदर्भातील आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.या मुद्यावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत काही आलबेल नाही, असे चित्र यातून पुढे आले आहे.
दरम्यान काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला संजय राऊत उपस्थित होते. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक झाली. उशिरा रात्रीपर्यंत चाललेल्या या बैठकीत जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे सोमवारी पुन्हा एकदा बैठक घेण्याचे ठरले. त्यात जागा वाटपाचा फैसला होण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रदेश काँग्रेसचे अध्क्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील काही प्रमुख काँग्रेस नेत्यांना रविवारी दिल्लीत पक्षाच्या बैठकीला जायचे असल्याने मविआची बैठक सोमवारी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांना आमदारकीचे वेध
शिवसेना – काँग्रेसमध्ये रस्सीखेच
विदर्भात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. लोकसभेत मिळालेल्या यशामुळे काँग्रेस या भागातील जागा सोडू इच्छित नाही. दुसरीकडे शिवसेनेने (ठाकरे) रामटेक लोकसभेची जागा काँग्रेसला सोडून मोठेपणा दाखवला होता. तसाच मोठेपणा आत्ता काँग्रेसने दाखवावा, अशी अपेक्षा शिवसेनेची आहे. नागपुरातील दक्षिण नागपूर आणि रामटेक या दोन जागा काँग्रेस-सेनेतील वादासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. यावर सोमवारच्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित आहे.
हेही वाचा : व्होट जिहाद’ आरोपातील फोलपणा उघड; मुस्लीमबहुल मतदारसंघांत भाजपच्याच मतांमध्ये वाढ
मने दुभंगली
जागा वाटप लाबंल्याने रामटेक व दक्षिण नागपूरमध्ये सेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मध्ये अस्वस्थता आहे. मागील पाच वर्षापासून आम्ही येथे तयारी करीत आहोत, दुसरीकडे शिवसेनेची ताकद कमी आहे त्यामुळे ही जागा सोडणे शक्यच नाही, असा या मतदारसंघातील काँग्रेस नेत्यांचा दावा असून काही जण यासाठीमुंबईत तळ ठोकून बसले आहेत. शिवसेनेचे अस्तित्व नाही, असे म्हणनाऱ्या काँग्रेसला आम्ही या निवडणुकीत आमची ताकद दाखवून देऊ, असा इशारा शिवसेनेने (ठाकरे) दिला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीतील दोन प्रमुख पक्षातील कार्कर्ते परस्परांसमोर उभे ठाकले आहे.