सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखपदी माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून काहीसे वळचणीला असणाऱ्या तनवाणी यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात यावी यासाठी माजी खासदार व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे प्रयत्न करत होते. शिवसेनेतील मोठ्या बंडाळीपूर्वीच औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेत बरीच खळबळ सुरू होती. मात्र, बंडाळीनंतर अचानक औरंगाबादचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची नियुक्ती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी करण्यात आल्यानंतर जिल्हाप्रमुखपदी नव्या नियुक्तीची प्रतीक्षा होती. तनवाणी यांच्या नियुक्तीमुळे आता महापालिका निवडणूक व लोकसभा निवडणुकीच्या तयारीला शिवसेनेकडून वेग दिला जात आहे.

किशनचंद तनवाणी हे शिवसेनेतून भाजपमध्ये गेले होते. गेल्या महापालिका निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपसाठी आखलेली रणनीती उपयाेगी पडली होती. मात्र, भाजपमधून ते पुन्हा शिवसेनेत आले. हे पक्षांतर एवढे दिवस त्यांना वळचणीला टाकणारे ठरले होते. शिवसेनेतील बंडाळीपूर्वी तनवाणी यांना म्हाडाचे सभापतीपद देण्यात यावे, अशा प्रकारच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, संघटनात्मक पातळीवर त्यांना पद मिळू नये असे प्रयत्नही शिवसेनेच्या एका गटाकडून सुरू होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना राज्यात नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेत संघटनात्मक बदल होतील, असे मानले जात होते.

हेही वाचा : मुळशीचे पाणी बारामतीच्या राजकारणाचे वळण बदलणार?; राष्ट्रवादीवर कुरघोडीची भाजपची रणनीती

तनवाणी यांच्या नियुक्तीनंतर महापालिका निवडणुकीपूर्वी केलेले बदल शिवसेनेला तारून नेतील काय, याची उत्सुकता शिवसैनिकांमध्येही आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर ‘ निर्णय घ्यावा’ असे फलक तनवाणी यांच्या समर्थकांनी शहरभर लावले होते. त्यामुळे तनवाणी हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत की नाही, यावरून संशय घेतला जात होता. मात्र, शिवसेनेतील काही जाहीर कार्यक्रमास त्यांनी हजेरी लावली. आपण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच काम करू, असे त्यांनी ठरविले. त्यानंतर त्यांना जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. या अनुषंगाने बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, ‘ आता लोकसभा निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणीसाठी केवळ वर्षभराचा कालावधीच हाती राहिला आहे.

हेही वाचा : समाजवादी पार्टीच्या बड्या नेत्याचा बसपात प्रवेश; मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी मायावतींचा मास्टरस्ट्रोक!

गेल्या लोकसभा निवडणुकीत सेनेतील काही मंडळींनीच दगा दिला हे खरेच. त्यामुळे नवे सहकारी घेणे भाग होते. किशनचंद तनवाणी हे सक्षम सहकारी आहेत. त्यांच्यामुळे शहरातील तीन मतदारसंघात चांगली बांधणी होईल.’ लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील हेही तयारी करत आहेत. त्यात बंडाळीनंतर शिवसेनेकडून पुन्हा संघटन उभे करण्यासाठी आता नियुक्त्या केल्या जात आहेत.

किशनचंद तनवाणी यांनीही महापालिका निवडणुकीसाठी अधिक जोमाने काम करू, असे ‘ लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. महापालिका निवडणुकीदरम्यान समर्थकांना बळ देत अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या तनवाणी यांच्यावर आता शहरातील तीन मतदारसंघांची जबाबदारी आल्याने त्याचे चांगले परिणाम दिसतील, असा दावा केला जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena uddhav thackeray aurangabad kishanchand tanwani election preparation ambadas danve chandrkant khaire print politics news tmb 01
Show comments