कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला राज्यात चांगले यश मिळाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला गत वैभवप्राप्त करून देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेना वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील पूर्वीप्रमाणे थोरला भाऊ होण्याचा त्यांचा प्रयत्न असून पाच जागांवर लढत देऊन विजय मिळवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे. जागा वाटपात महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यातील जागा वाटपाचा गुंता नीटपणे सुटला तर शिवसेनेला हे स्वप्न साकार करणे शक्य होणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला भरघोस यश मिळाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा पदरात पडून घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या प्राथमिकसूत्रानुसार काँग्रेस व शिवसेनेला जवळपास सामान जागा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यात दिसणार आहे.

हेही वाचा – लोकसभेतील यशानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांची जागांची मागणी वाढली

कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे. कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर व हातकणंगले या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून निवडून आलेले आमदार आता शिंदे गोटात आहेत. त्यामुळे ठाकरे सेनेकडे सध्या एकही आमदार नाही. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात यापूर्वी दमदार कामगिरी केली असल्याचा संदर्भ देत शिवसेनेने जिल्ह्यात पाच जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. मुंबईहून आलेल्या शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांनी जिल्ह्यात ठाण मांडून मतदारसंघनिहाय आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे.

शिवसेनेने कोल्हापूर उत्तर, राधानगरी – भुदरगड, शाहूवाडी, हातकणंगले व शिरोळ या यापूर्वी जिंकलेल्या विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने या ६ जागांवर विजय मिळवून आपली ताकद दाखवून दिली होती. शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेकडे तरुणांचा ओघ वाढला आहे. ही अनुकूल परिस्थिती लक्षात घेता शिवसेनेला कोल्हापूरमध्ये पाच विधानसभा मतदारसंघ मिळाले पाहिजेत अशी मागणी मातोश्रीकडे करणार असल्याचे शिवसेनेचे उपनेते, जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले.

‘उत्तर’ची स्पर्धा वाढली

राज्यसभा निवडणुकीत अनपेक्षितरित्या पराभूत झालेले संजय पवार हे स्वतः कोल्हापूर उत्तर मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. सध्या कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या आमदार जयश्री पाटील आहेत. तर, येथे मालोजीराजे छत्रपती किंवा मधुरिमाराजे छत्रपती या दांपत्यांपैकी एक जण काँग्रेसकडून लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथे जागा वाटपाबाबत आघाडीअंतर्गत पेच होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी कोल्हापूर व हातकणंगले हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे होते. काँग्रेसने मागणी केल्यानंतर कोल्हापूरची जागा त्यांना देण्यात आली. श्रीमंत शाहू महाराज यांच्या विजयामध्ये शिवसेनेचेही मोठे योगदान आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला काँग्रेसने शिवसेनेला मदत करण्याची गरज आहे, असे संजय पवार यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – मराठवाड्यातील शिवसेनेवर ठाकरे की शिंदे कोणाचे वर्चस्व अधिक ?

याशिवाय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी ४ मतदारसंघांवर दावा सांगितला आहे. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी जागावाटपाचा संभाव्य पेच लक्षात घेऊन सावध भूमिका घेताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडीने एकत्रित लढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.